नगर हादरले : घरगुती वादातून पत्नीसह मुलाचा खून | पुढारी

नगर हादरले : घरगुती वादातून पत्नीसह मुलाचा खून

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर शहरातील गोंधवणी भागात राहणाऱ्या बलराम कुदळे (वय ४०) याने पत्नीसह आपल्‍या चार ५ वर्षांच्या मुलाची हत्या केली. तालुक्यातील गोंधवणी (दिघी शिवार) गावाच्या शिवारात ही धक्कादायक घटना आज (दि. १०) घडली. रामनवमीच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीच्या डोक्यात कुदळीचे घाव घालून यमसादनी धाडल्यानंतर स्वतःच्या ५ वर्षीय मुलाला आंब्याच्या झाडाला फाशी दिली. विशेष म्हणजे या घटनांचे चित्रीकरण करून या नराधमाने पोलीस पाटलांसह ग्रामस्थांना पाठविले. यानंतर पोलिसांनी गतीने चक्रे फिरवून आरोपीला ताब्यात घेतले. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे.

रामनवमीच्या दिवशी सकाळी १० च्या सुमारास घडलेल्या या घटनेने श्रीरामपूरसह जिल्हा हादरला. बलराम दत्तात्रेय कुदळे (वय ४० ) असे आरोपीचे नाव आहे. अक्षता बलराम कुदळे (वय ३५) मुलगा शिवतेज (वय ५ ) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी,  कुदळे कुटुंबीय गोंधवणी गावात राहते. बलराम याचे त्याच्या आई-वडिलांशी पटत नव्हते. तो पत्नी व मुलासह शेतात घर बांधून राहत होता. त्यांच्यातही काही दिवसांपासून वाद होत होता. भांडणाला कंटाळून अक्षदा मुलासह काही दिवस माहेरी राहिली. नुकतीच ती पुन्हा आपल्या घरी आली होती. गेल्या सहा महिन्यांपासूनचा राग बलराम याच्या डोक्यात होता. पत्नी व मुलाची हत्या करण्याचा कट त्याने यापुर्वीच आखला होता.

पत्नी व मुलगा घरी आल्याने त्याला ही संधी प्राप्त झाली. घरासमोर पत्नी काम करत असताना बलरामने पाठीमागून जाऊन तिच्या डोक्यात कुदळीने वार केला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पाच वर्षांचा मुलगा शिवतेज याला त्याने घरापासून सुमारे शंभर फूट अंतरावर असलेल्या आंब्याच्या झाडाला फाशी दिली. मुलाचा जीव जाईपर्यंत सुमारे दहा ते पंधरा मिनिटे तो तेथेच थांबला. त्यानंतर या थरार नाट्याचे मोबाईलवर चित्रीकरण केले. त्यानंतर बलराम याने या घटनेची चित्रफित कुटुंबीयांना व गावकर्‍यांना पाठवली. आरोपीने दिघीचे पोलीस पाटील यांना फोन करून दोन खून झाल्याबद्दल माहिती दिली. व त्यांना घटनास्थळी बोलावले. समोरचे दृश्य पाहून ते काही क्षण गर्भगळीत झाले. परंतु घटनेचे गांभीर्य पाहताच त्यांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर दुपारी पोलीस घटनास्थळी हजर झाले.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात बलराम कुदळे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button