

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बसपाच्या प्रमुख मायावती (Mayawati) यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना मायावती यांनी राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. बसपाने दलितांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. परंतु दीर्घकाळ उत्तर प्रदेशात सत्तेत राहिलेल्या काँग्रेसने दलितांच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी पावले उचलली नाहीत. त्यांना त्यांचे विस्कळीत झालेले घर सांभाळता येत नाही; पण ते आमच्या पक्षाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, अशा शब्दात मायावती यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
या वेळी मायावती (Mayawati) म्हणाल्या की, बसपा भाजपबाबत मवाळ भूमिका घेत आहे, कारण मायावतींना ईडी, सीबीआयची भीती वाटत आहे, असा राहुल गांधी यांनी माझ्यावर केलेला आरोप खोटा आहे. बसपासोबत युती करून मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती, हे त्यांचे विधान पूर्णपणे निराधार आहे. विरोधी पक्षांवर भाष्य करण्यापूर्वी काँग्रेसने शंभर वेळा विचार करावा, असेही त्या म्हणाल्या.
काँग्रेसला भाजप-आरएसएसच्या विरोधात कुठेही पूर्ण ताकदीनिशी लढता आलेले नाही. दुसरीकडे काँग्रेस आणि विरोधकांना कमकुवत करण्याचा भाजप प्रयत्न करत आहेत. आ चायना टाईप वन पार्टी सिस्टम लागू करून देशात संविधान कमकुवत करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोपही मायावती यांनी केला.
मी सत्तेत असतानाही राहुल गांधी यांनी मोर्चे आणि धरणे करून माझे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला; पण इतर पक्षांच्या सरकारमध्ये त्यांनी कधीही तसे केले नाही. इतर पक्षांबद्दल बोलण्याआधी त्यांनी स्वत:चा पक्ष कसा विस्कटला, याची काळजी करायला हवी, असा टाेलाही मायावतींनी लगावला.
दरम्यान, राहुल गांधी यांनी शनिवारी म्हटलं हाेतं की, मायावतींनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवली नाही. कारण त्यांना ईडी, सीबीआयची भीती वाटत हाेती. मी बसपा संस्थापक कांशीराम यांचा आदर करतो. रक्त आणि घामाने त्यांनी उत्तर प्रदेशातील दलित आवाज जागवला हाेता. आज मायावती म्हणतात की मी त्या आवाजासाठी लढणार नाही, असेही राहुल गांधी म्हणाले हाेते.
हेही वाचलंत का ?