उडता पंजाब, डुलता महाराष्ट्र

उडता पंजाब, डुलता महाराष्ट्र

आबुराव, त्या पंजाबमध्ये व्यसनांनी किती गोंधळ घातलाय, हे ऐकताय, वाचताय ना तुम्ही? बाबुरावांनी ग्लासात बर्फाचे खडे टाकत म्हटलं. तेव्हा आबुराव निमूटपणे काडीने ग्लासातला ऐवज ढवळत म्हणाले, नुसतं वाचत नाही, बघितलंयही. 'उडता पंजाब' नावाच्या एका सिनेमात.
अरेरे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे एका ना एका व्यसनात गुरफटावेत हे किती दुर्दैव म्हणायचं. त्यापेक्षा आपण खूप बरे, नाही का? बाबुरावांनी मोठा घोट घेतला.
आपण म्हणजे तुम्ही-आम्ही?

खरं तर आपलं सगळं राज्यच म्हणा ना! आपला काही 'उडता महाराष्ट्र' झाला नाही.हो. पण आपला 'डुलता महाराष्ट्र' तर कधीचाच झालाय!तो कसा काय? सोडा वाढवा थोडा.
किती बाबतींमध्ये 'हो, नाही' 'आहे, नाही', ह्यात डुलणं चाललंय बघा ना.
उदाहरणार्थ?
मुलांच्या परीक्षा, पुढचे प्रवेश, एकूण शिक्षण ह्याबाबतीत? सगळं 'आहे, नाही' ह्यात डुलतंय. एस्टी संपाचा मामला? मिटतोय, मिटत नाही ह्यामध्ये डुलतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका? आता होत्या, आता नाहीत, कधी होणार माहीत नाही, अशा अनिश्चिततेमध्ये डुलताहेत.. पुण्यातला नदी सुधार प्रकल्प?
त्याचं तर थेट पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झालंय ना?

होय हो, पण नदी नक्की कोणत्या पक्षामुळे सुधारायची, हे आपापसात नक्की ठरत नाहीये अजून.
मुळात नदी गलिच्छ झालीये, नदीकाठाचं सुशोभीकरण व्हायलाच हवंय ह्यावरच एकमत होत नाहीये का?
तसं नाही. तो सगळा राडा सगळ्यांना उघडपणे दिसतोच आहे; पण श्रेयाची छुपी लढाई कामात खोडा घालत्येय.
त्यामुळे नदी सुधार कॅन्सल होतोय का?
छे छे! एवढ्या लगबगीने कॅन्सल तरी कोण करेल? चौकशी समिती नेमायची, बैठका घ्यायच्या, अहवाल मागवायचे, असा वेळखाऊपणा चाललाय! कोणताही घास कोणालाही सरळ, सुखाने घेऊ द्यायचाच नाही हे ब्रीद झालंय सध्या.
आबुरावांनी फरसाणचा बकाणा भरत म्हटलं.

उद्घाटनांचा तर सपाटा लावलेला दिसतोय अगदी. परवा 14 मार्चला मनपाच्या नगरसेवकांची मुदत संपायची होती तेव्हा तर एका दिवसात 86 प्रकल्पांची उद्घाटनं केली म्हणे! एका दिवसात म्हणजे दिवसभरातल्या कामाच्या फार फारतर दहा तासांत 86 उद्घाटनांचा लोड फार पडला असेल नाही? ताशी नऊ उद्घाटनं, म्हणजे दर सहा-सात मिनिटांना एक, असा रेट पडतो! चेष्टा नाहीये. फिती कापूनकापून मंत्र्यांचे हात दुखायला लागले असतील अगदी.
बिचारे! तेवढीच घाई दुसरीकडे चाललेली, प्रकल्प लोकार्पण करायची. प्रकल्प नीट पूर्ण झालाय का?, खरोखर लोकांच्या उपयोगी पडणार आहे का?, हे बघायलाही कोणाला फुरसत नव्हती. अर्धीकच्ची कामंही हातासरशी लोकार्पण झालीसुद्धा! माझा ग्लास फुल कराहो हातासरशी!

घ्या. बर्फ किती टाकू? 86.
काय? 86 खडे? बसतील का एवढे ग्लासात?
सॉरी सॉरी. तो आकडा जरा जास्तच बसलाय डोस्क्यात! म्हणून तसं पडलं तोंडातून. पण काय हो? एवढे सगळे प्रकल्प चांगल्या प्रकारे पुरे होतील?
त्याच्याशी कोणाला काय करायचंय? पुढे जो तो आपल्या नशिबाने जाईल किंवा राहील. आता माणसांना त्यांच्यावर डुलवता आलं, लै झालं.
बघा ना! महाराष्ट्राची 'राकट देशा, कणखर देशा' ही गोविंदाग्रजांनी केलेली भलावण आता थोडी बदलली की झालं.
ती कशी काय?
हेच की. ह्याच्यापुढे 'डुलत्या देशा, हलत्या देशा, महाराष्ट्र देशा,' असं म्हणावं! आबुराव डुलतडुलत म्हणाले. बोलता बोलता तिसरा पेग त्यांनी संपवत आणला होता. त्यांना हलतडुलत ठेवायला तो पुरेसा होता. बाकी महाराष्ट्राला डुलवत ठेवायला राजकारण समर्थ होतं!

– झटका

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news