

कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : दौंड-मनमाड 236 किलो मिटर लांबीचा रेल्वे मार्ग आता दुहेरीकरणाची कित्येक वर्षांची मागणी पुर्णत्वाकडे नेताना दिसत आहे. 120.28 किलो मिटर लांबीचा मार्ग दुहेरीकरणाने पुर्ण झाला. उर्वरित 116.33 किलो मिटर लांबीचे काम प्रगतीपथावर आहे. यासर्व प्रकल्पास 2081 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. दुहेरीकरणामुळे आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त श्रीसाईबाबांच्या शिर्डीसह विविध धार्मिक देवस्थानांचे दर्शन अधिक सुलभ होवून मालगाडीद्वारे माल वाहतूक अधिक जलद गतीने होईल.
दौंड- मनमाड रेल्वे मार्गावरील काष्टी ते बेलवंडी, सारोळा ते अकोळनेर, पढेगाव ते पुणतांबा व कान्हेगाव ते मनमाड या 120.28 किलो मिटर लांबीचे दुहेरीकरणाचे काम पुर्ण झाले आहे. दरम्यान, बेलवंडी ते विसापूर व निंबळक ते बेलवंडी ही 62.29 किलो मिटर लांबीची रेल्वे लाईन अंतिम टप्प्यात आली आहे. काष्टी ते दौंड, सारोळा ते विसापूर, अकोळनेर ते निंबळक व पुणतांबा ते कान्हेगाव या 54.4 किलो मिटर रेल्वेमार्गाचे काम सुरु आहे. आतापर्यंत यावर 1,525 कोटी रूपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले.
गोदावरी नदीवर सर्वात मोठ्या पुणतांबा येथील रेल्वे पुलाचे काम सध्या सुरू आहे. या दुहेरीकरणाच्या कामात 33 पैकी 11 मोठ्या, 117 पैकी 100 छोट्या पुलांचे काम पुर्ण झाले आहे. 6 हजार पैकी 2400 ठिकाणी पक्का पायाचे बांधकाम पुर्ण झाले आहे. यासाठी 68.16 हेक्टर जमीन अधिगृहीत केली जाणार आहे. यापैकी 13.14 टक्के जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 21 पैकी 11 रेल्वेस्थानकांची कामे पुर्ण झाली. दौंड- मनमाड रेल्वेमार्गावर दिवसेंदिवस प्रवाशी व भाविकांच्या सेवेत नविन रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मालगाड्यांचे प्रमाण वाढले आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील काकडी येथे शिर्डीसाठी विमानतळाची सोय झाली. रात्रीचे लॅडींग सुविधा सुरू झाल्यांने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नव्याने नागपूर- मुंबई समृध्दी महामार्ग सुरू झाल्याने येथील विकासाला आता अधिक गती मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
दुहेरीकरणाच्या कामामुळे दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर खोळंबणार्या एकेरी वाहतुकीचा प्रवास आता आणखी सुकर होणार आहे. त्यातच देशाला स्वातंत्र मिळुन 75 वर्षे पुर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तब्बल 400 रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात 29 कोटी रूपये खर्चाचे कोपरगाव रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरण कामाचा समावेश झाला आहे.
हेही वाचा