

पुणे : पुढारी वृत्तसेवा : येथील आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीच्या पुण्यातील कार्यालयात शरद जोशी शेतकरी संघटनेच्या वतीने पिक विम्याची नुकसानभरपाई रक्कम तत्काळ मिळण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन केले. पोलिसांच्या मध्यस्थीने विमा कंपनीने एक महिन्याच्या आत रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आश्वासन दिल्याने तुर्त आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी दिली.
येथील आयसीआयसीआय लोम्बांर्ड पिक विमा कंपनीच्या राज्यस्तरीय कार्यालयात पिक नुकसानभरपाईची विम्याची रक्कम थकीत असल्याने त्रस्त झालेल्या शेतकर्यांनी गुरुवारी (दि.16) सकाळी कंपनीचे कार्यालय गाठले आणि बोंबाबोंब आंदोलन करुन परिसर दणाणून सोडला. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करीत संयुक्त बैठक घडवून आणली. या बैठकीत कंपनीकडून शेतकरी संघटनेस लेखी आश्वासन देण्यात आले आहे. त्यानुसार जर एक महिन्याच्या आत राज्यातील शेतकर्यांच्या खात्यावर पिकविमा नुकसान भरपाईचा परतावा मिळाला नाही, तर पुन्हा कोणतीही पूर्वसूचना न देता या कंपनीच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
आंदोलनात श्रीहरी गायकवाड, दयानंद चौधरी, चेतन चौधरी, श्रीराम डिसले, बाळासाहेब गवळी, राजेंद्र फरताडे, पांडुरंग चौधरी, बजरंग चौधरी, सिद्धांत चौधरी, गोटू पाटील, विशाल चौधरी, प्रदीप चौधरी, विजय चौधरी, संदीप चौधरी, वैभव चौधरी, सुभाष चौधरी, बाळू भायगुडे, प्रकाश तानवडे, अमोल चौधरी, अक्षय फरताडे, श्रीधर फरताडे, भास्कर चौधरी, सुमन चौधरी, ऋषिकेश चौधरी, लक्ष्मण चौधरी, प्रितेश तानवडे, सुरेश चौधरी, सखाराम मते, बालाजी चौधरी, धीरज चौधरी, मधुकर चौधरी आदींसह राज्यभरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, आयसीआयसीआय लोम्बांर्ड विमा कंपनीचे अधिकारी प्रशांत चोपडे यांनी शेतकरी संघटनेस दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, खरीप हंगाम 2021 च्या दाव्याबाबत संघटनेने दिलेली शेतकर्यांची यादी तपासली जाईल. तसेच दाव्याच्या सूचना दिल्यास तरतुदींनुसार पैसे दिले जातील. प्रधान मंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार स्थानिकीकरण आणि पीक काढणीनंतरच्या दाव्यासाठी प्रामुख्याने दाव्याची माहिती आवश्यक आहे. खरिप 2021 साठी राज्य आणि केंद्राचा विमा हिस्सा मिळाल्यानंतर शेतकर्यांचे दावे निकाली काढले जातील.
हेही वाचा