

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'गावागावांत जशा आर्थिक उलाढाली करणार्या बँका आहेत, त्याच धर्तीवर बियाणांच्या देशी वाणांच्या बँका उघडल्या पाहिजेत,' असे मत पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केले.
देशी बीयांच्या वाणांच्या रक्षणार्थ केलेल्या कामाबद्दल मिळालेला पद्मश्री पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रथमच पोपेरे या पंधराव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, बायफ या संस्थेचे संजय पाटील आणि जितीन राठी उपस्थित होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलियन्टस रिसर्च या संस्थेस वसुंधरा मित्र ऑर्गनायझेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे संचालक आणि ज्येष्ठ संशोधक डॉ. विलास टोणपी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
पोपेरे म्हणाल्या, 'घरची परिस्थिती गरीब असल्याने औपचारिक शिक्षण होऊ शकले नाही, परंतु वडिलांसोबत शेतीत काम करताना अनौपचारिक शिक्षणाचे खूप धडे गिरविले आणि ते आचरणात आणले. आज आपण पैसे देऊन विषारी अन्न विकत घेत आहोत. आपण जे अन्न खातो ते कुठून येते, त्याच्यावर नक्की काय प्रक्रिया होते, ती प्रक्रिया होत असताना नक्की त्याच्यावर कोणत्या रसायनांचा मारा होतो आहे, या गोष्टींबाबत आपण खूप अनभिज्ञ आहोत. आधुनिक जीवनशैलीच्या नावाखाली आपण चुकीचे वर्तन आचरणात आणत आहोत. ज्यात चमक आहे, पण त्यात धमक नसते.'
हेही वाचा