धुळे: देवपूर येथे भरधाव ट्रकने तरुणाला चिरडले

देवपूर येथे  भरधाव ट्रकच्या धडकेत ठार झालेला  रोहित सुर्यवंशी
देवपूर येथे भरधाव ट्रकच्या धडकेत ठार झालेला रोहित सुर्यवंशी

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळ्याच्या देवपूर परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकी स्वाराला चिरडल्याची घटना आज ( दि.२६) घडली. या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित ड्रायव्हर हा मद्य प्यायला होता की नाही, याबाबतच्या तपासणी करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली आहे.

धुळे येथील देवपूर परिसरातील एल एम सरदार हायस्कूलच्या प्रवेश द्वारा जवळ हा अपघात घडला. यात रोहित योगेश सूर्यवंशी (वय 18) हा युवक त्याच्या दुचाकीने नगावबारीकडून धुळे शहराकडे जात होता. यावेळी तो घटनास्थळाजवळ पोहोचला. मात्र समोरून रस्ता ओलांडणाऱ्या एका मोपेडला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल गेल्याने तो रस्त्यावर पडला. याच वेळेस नगावबारी कडून भरधाव वेगाने येणारा ट्रक त्याच्या अंगावरून गेला. या अपघातात रोहित सूर्यवंशी याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र नेहरू चौकात त्याला लोकांनी पाठलाग करून पकडले. यानंतर त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी चौकशी केली असता त्याचे नाव आरिफ खान हारुण खान पठाण असे असून तो विटाभट्टी परिसरातील राहणारा आहे. सदर ट्रक हा सिमेंटची वाहतूक करणारा ट्रक होता. तर घटना घडली त्यावेळी हा ट्रक रिकामा होता.

दरम्यान, देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक चालक हारून खान पठाण यांच्या रक्ताचे नमुने आणि अन्य तपासण्या करून तो दारू प्यायला होता की नाही, याची खात्री केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली आहे.

अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर

दरम्यान, या अपघातामुळे देवपूर परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नेहरू चौक ते बुध बाजार दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांसमोर वाहने बेशिस्तपणे लावलेली असतात. त्याचप्रमाणे काही विक्रेते या ठिकाणी रहदारीला अडथळा होईल अशा पद्धतीने हात गाडीवर व्यवसाय करतात. याच ठिकाणी मासे विक्रेते देखील अडथळा होईल, अशा पद्धतीने स्टॉल लावत असल्याच्या तक्रारी आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news