नाशिककरांनो महत्वाची बातमी! शनिवारी पाणीपुरवठा राहणार बंद | पुढारी

नाशिककरांनो महत्वाची बातमी! शनिवारी पाणीपुरवठा राहणार बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – धरणातील जलसाठ्याने तळ गाठल्यामुळे महापालिकेने अखेर अघोषित पाणीकपात सुरू केली असून मुख्य वितरण वाहिन्यांसह उपवितरण वाहिन्यांची दुरुस्ती आणि व्हॉल्व्ह बदलण्याच्या नावाखाली शनिवारी (दि. २५) संपूर्ण दिवसभर तसेच रविवारी (दि. २६) सकाळी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

नाशिक व नगरच्या धरणांमधून जायकवाडी धरणासाठी ८.६ टीएमसी पाणी सोडल्यामुळे आधीच कमी असलेला धरणांतील जलसाठा अधिकच खालावला. त्यामुळे महापालिकेच्या पाणीआरक्षण मागणीत कपात करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाला घ्यावा लागला. सद्यस्थितीत नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूह तसेच मुकणे व दारणा धरणात जेमतेम १०९१ दशलक्ष घनफूट पाणीआरक्षण शिल्लक राहिले आहे. उपलब्ध पाणी आरक्षण ३१ जुलै २०२४ पर्यंत पुरविण्यासाठी आठवड्यातील दर शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव प्रशासनाने लोकसभा निवडणुकांपूर्वीच पालकमंत्र्यांसमोर सादर केला होता. परंतु पाणीकपातीचा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता लक्षात घेत हा प्रस्ताव थंड बस्त्यात टाकण्यात आला. आता मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाणीकपातीच्या प्रस्तावाची प्रशासनाला पुन्हा आठवण झाली आहे. त्याचाच भाग म्हणून शनिवार, रविवार अशी अघोषित पाणीकपात लागू केली जात आहे. शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या तसेच उपवितरण वाहिन्यांची दुरुस्ती तसेच व्हॉल्व्हची दुरुस्ती, व्हॉल्व्ह बदलणे आदी कामांसाठी शनिवारी सकाळी ९ पासून दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच रविवार सकाळच्या सत्रातील पाणीपुरवठादेखील बंद राहणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

दरडोई १०० लिटर पाणी

महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक आयोगाच्या निर्देशांनुसार दररोज दरडोई १३५ लिटर पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे. पाणीपुरवठा यंत्रणेतील गळती आणि हिशेबबाह्य पाण्याचा विचार करता महापालिकेतर्फे दररोज १५० लिटरहून अधिक पाणीपुरवठा केला जात होता. आता मात्र धरणांतील जलसाठा घटल्याने अघोषित पाणीकपात सुरू करण्यात आली असून, दरडोई १०० लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठच्या असमान वितरणामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. आता शनिवारी संपूर्ण दिवसभर तर रविवारी सकाळच्या सत्रात अर्थात दीड दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांचा त्रास अधिकच वाढणार आहे.

हेही वाचा:

Back to top button