संतापजनक! नाशिकमध्ये अजूनही माणसामाणसांत भेदभाव, त्र्यंबकेश्वर गावजेवणात जातीनुसार पंगती | पुढारी

संतापजनक! नाशिकमध्ये अजूनही माणसामाणसांत भेदभाव, त्र्यंबकेश्वर गावजेवणात जातीनुसार पंगती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर येथील गावजेवणात विशिष्ट जातीच्या लोकांची एक पंगत तर बहुजनांसाठी वेगळी पंगत, अशी पद्धत असून, हा प्रकार माणसामाणसांत भेदभाव करणारी आहे, सामाजिक विषमतेला खतपाणी घालणारी आहे. त्यामुळे ही पद्धत तत्काळ बंद व्हावी, अशा मागणीचे निवेदन त्र्यंबकेश्वर तहसीलदारांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने देण्यात आले आहे. (Maharashtra Andhshradha Nirmulan Samiti)

निवेदनात म्हटले, अनेक वर्षांच्या परंपरेनुसार त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथील महादेवी ट्रस्टतर्फे दरवर्षी प्रयोजन म्हणजे गावजेवण आयोजित केले जाते. दरवर्षी चैत्र किंवा वैशाख महिन्यात ग्रामदेवतांची काही धार्मिक कर्मकांडे केल्यावर ही जेवणावळ आयोजित केली जाते. त्यासाठी संपूर्ण गावातून लोकवर्गणी तसेच वस्तूरुपात खाद्यसामग्री गोळा केली जाते. गावजेवण असल्याने त्र्यंबकेश्वर गावातील सर्वच सामाजिक स्तरातील लोक इथे जेवणासाठी येतात. मात्र या गावोत्सवात एका विशिष्ट जातीचे लोक व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी स्वतंत्रपणे अन्न शिजवले जाते. त्यांची जेवणाची पंगतसुद्धा इतर बहुजन समाज घटकांपासून वेगळी बसते. महादेवी ट्रस्टकडून सार्वजनिक भोजनाच्या ठिकाणी असा संतापजनक व जातीभेदाला खतपाणी घालणारा प्रकार राजरोसपणे येथे सुरू असल्याचे काही स्थानिक लोकांनी अंनिसच्या लक्षात आणून दिले. (Nashik Trimbakeshwer Pangat)

जर संबंधित महादेवी ट्रस्टकडून असा जातीभेद व पंगतीभेद होत असेल तर हे देशाच्या राज्यघटनेचे उल्लंघन करणारे आहे. याशिवाय बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून मानले गेलेल्या त्र्यंबकेश्वर गावाला श्रद्धेपोटी येणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेशी केलेली ती गंभीर प्रतारणा असून, ही पद्धत बंद व्हायला हवी. सोमवारी (दि.२९) महादेवी ट्रस्टतर्फे गावजेवणाचा कार्यक्रम होत असून, प्रशासनाने या प्रकाराकडे गंभीरपणे बघावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. निवेदनावर राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, कार्याध्यक्ष त्र्यंबकेश्वर संजय हराळे, प्रधान सचिव दिलीप काळे, जिल्हा कार्याध्यक्ष डाॅ. श्यामसुंदर झळके, जिल्हा प्रधान सचिव नितीन बागूल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (Nashik Trimbakeshwer Pangat)

.. तर कायदेशीर कारवाई करा
लोकवर्गणी काढून जर गावजेवणाची व्यवस्था केली जात असेल तर सर्व अन्न एकत्रित शिजवायला हवे. एकत्रित पंगत बसवायला हवी.  मागील वर्षी अंनिस आणि प्रशासनाच्या प्रयत्नाने एकत्रित पंगत बसविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यावर्षी वेगवेगळ्या पंगती बसविण्याचा घाट असल्याने, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही अंनिसच्या वतीने करण्यात आली. (Nashik Trimbakeshwer Pangat)

गावजेवण पंगतीची परंपरा अशी…
त्र्यंबकेश्वर येथील महादेवी ट्रस्टमार्फत दरवर्षी चैत्र किंवा वैशाख महिन्यात जेवणावळीचे आयोजन केले जाते. गावजेवण असल्याने त्र्यंबकेश्वर गावातील सामाजिक स्तरातील सर्वच लोक जेवणासाठी येत असतात. मात्र पंगत बसवताना माणसामाणसांत भेदभाव केला जात असल्याचा आणि एका विशिष्ट जातीचे लोक तसेच त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी स्वतंत्रपणे अन्न शिजवले जाते. त्यांची जेवणाची पंगत सुद्धा इतर समाज घटकांपासून वेगळी बसवली जाते असा आरोप अंनिसच्या माध्यमातून करण्यात आला होता.

हेही वाचा:

Back to top button