Nashik Summer Heat : सावधान, उष्माघाताचा धोका वाढलाय! नाशिककर आपली काळजी घ्या!

नाशिक : एरवी भाविक, पर्यटक अन‌् हॉकर्सची वर्दळ राहणारा गोदाघाट सद्या भरदुपारी असा निर्मनुष्य होतो. कोरडाठाक झालेला गांधीतलाव आणि एकूणच सीमेंट कॉक्रीटची चादर तप्त लहरींमध्ये भर टाकत आहे. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक : एरवी भाविक, पर्यटक अन‌् हॉकर्सची वर्दळ राहणारा गोदाघाट सद्या भरदुपारी असा निर्मनुष्य होतो. कोरडाठाक झालेला गांधीतलाव आणि एकूणच सीमेंट कॉक्रीटची चादर तप्त लहरींमध्ये भर टाकत आहे. (छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या तापमानामुळे शहरातील उष्णतेचा पार ३९ अंशांवर गेल्याने उष्माघाताचा धोका बळावला आहे. वाढत्या तापमानात जलशुष्कता (डिहायड्रेशन) होऊन मृत्यू ओढावण्याची शक्यता असल्याने वेळीच उपचार करण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे. दरम्यान, उष्माघात झालेल्यांवर तत्काळ उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

ग्लोबल वॉर्मिंगचा फटका नाशिकलादेखील बसला आहे. उन्हाळ्यात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. गत २८ मार्चला शहरात ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यानंतर नाशिकचा पारा खाली उतरलेला नाही. एप्रिल व मे महिन्यात तापमान अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिकचा पारा चाळीशीवर जाण्याचा धोका आहे. रस्त्यावरील डांबरही वितळू लागल्याने उन्हाचा चटका असह्य बनला आहे. पादचारी, दुचाकीस्वारांना उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी, दुपारच्या वेळी रस्त्यावरील वर्दळही कमी झाली आहे. थंडपेयांच्या दुकानांकडे आपसूकच पावलं वळत आहेत.

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्माघात बळावण्याची शक्यता असल्याने नाशिक महापालिका अलर्ट मोडवर आली आहे. उष्माघात टाळण्यासाठी उन्हात घराबाहेर न पडण्याचे आवाहन महाापलिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा सायंकाळी कमी तापमान असताना करावीत. सैल, पांढऱ्या किंवा फिक्कट रंगाच्या सुती कपड्यांचा वापर करावा. पाणी भरपूर प्यावे. डिहायड्रेशन होऊ देऊ नये, गरज पडल्यास जलसंजीवनीचा वापर करावा. उन्हात गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्रीचा वापर करावा. घरात कूलर्स, एअर कंडिशनर्स, वाळ्याचे पडदे वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

उष्णघाताची कारणे
– तीव्र उन्हात शारीरिक श्रमाची, अंग मेहनतीची व कष्टाची कामे
– कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे.
– काच कारखान्यात काम करणे.
– जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे.
– घट्ट कपड्यांचा वापर.

अशी आहेत लक्षणे
– मळमळ, उलटी, हात-पायांत गोळे येणे, थकवा येणे, ४० डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे. क्वचित लाल होणे, घाम न येणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी, अस्वस्थता, बेशुद्धावस्था.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news