नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चालूवर्षी नाशिकमध्ये उष्णतेचा दाह जाणवत असून, मार्च महिन्यात सरासरी तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ झाली. त्यामुळे २०१७ नंतर कधी नव्हे ते मार्च महिन्यात जिल्ह्यात पारा चाळिशीच्या जवळ पोहोचल्याने अंगाची लाहालाही झाली आहे. उष्णतेचा दाह वाढल्याने जिल्हावासीय हैराण झाले आहेत. त्यामुळे उन्हापासून काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हवामान विभागाकडून यंदा उन्हाळा कडक असेल असा अंदाज पहिलेच वर्तविण्यात आला होता. जिल्हावासीयांना मार्च महिन्यात त्याची अनुभूती आली. उत्तर भारताकडून विशेषत: दक्षिण राजस्थान व गुजरात राज्यातील उष्णतेत वाढ झाली. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या एकूण वातावरणावर पाहायला मिळाला. नाशिक जिल्ह्यात मार्चच्या अखेरच्या टप्प्यात कमाल व किमान तापमानाच्या पाऱ्यात लक्षणीय वाढ झाली. एरवीपेक्षा पाऱ्यात दोन ते तीन अंशांची भर पडल्याने तापमानाने थेट चाळिशी गाठली.
गेल्या काही वर्षात हवामान बदलाचा परिणाम जागतिक स्तरावर जाणवू लागला आहे. दरवर्षी तापमानातील चढता क्रम कायम आहे. तापमानवाढीचा हा फटका नाशिक जिल्ह्याला बसतो आहे. २०१७ नंतर प्रथमच मार्च महिन्यात जिल्ह्यात पारा चाळिशीच्या आसपास पोहोचला आहे. नाशिकमध्ये २८ मार्च रोजी पारा ३९.२ अंशांवर स्थिरावला. तर २६ ते २९ या कालावधीत पारा सातत्याने ३९ अंशांवर स्थिरावला होता. त्यामुळे सामान्य जनता होरपळून निघाली. यापूर्वी २९ मार्च २०१७ रोजी नाशिकमध्ये सर्वाधिक ४०.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे हा इतिहास बघता २०१७ नंतर चालूवर्षी पहिल्यांदाच उन्हाने जिल्ह्यात कहर केला आहे. भविष्याच्या दृष्टीने विचार केल्यास तापमानवाढीची ही समस्या जिल्हावासीयांसाठी धोक्याचा इशारा आहे.
यंदा २०१० चा रेकॉर्ड मोडणार?
जिल्ह्यात जवळपास दोन दशकानंतर पारा ऐन मार्च महिन्यात चाळिशीपर्यंत पोहोचला. यापूर्वी एप्रिल २०१० मध्ये तब्बल ४२.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. पण, यंदाचा कडक उन्हाळा बघता एप्रिलअखेरपर्यंत नाशिकचा पारा ४३ अंशांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे जिल्हावासीयांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागू शकतो.
अशी घ्या काळजी…
उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. उन्हात अतिकष्टाची कामे करू नका, असे आवाहन प्रशासन करत आहे. तसेच दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंडपेये घेऊ नका. दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे, उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये. मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात बसवू ठेवू नये. गडद घट्ट व जाड कपडे परिधान करणे टाळावे. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत, आदी सूचना करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा: