मुंबई; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ हा भाजपचाच आहे. पक्षाने आपणास उमेदवारी दिल्यास आपण या मतदारसंघात लढणार आणि जिंकणार, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली. यामध्ये कुणी लुडबुड करू नये, असा इशाराही त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिंदे शिवसेनेला दिला आहे. आज (बुधवारी) या मतदारसंघात पक्षाचे नेते उमेदवाराचे नाव जाहीर करणार आहेत आणि आपण स्वत: बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर आहोत, असेही राणे यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावरही त्यांनी कडवी टीका केली.
रामलीला मैदानात इंडिया आघाडीची जी सभा झाली, त्याबाबत त्यांनी टीका करण्यासाठी पत्रकार परिषद घेत असल्याचे सुरुवातीला स्पष्ट करत इंडिया आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. त्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, या मतदारसंघातून भाजपचाच उमेदवार लढेल. मी माधार घेतलेली नाही. मी कुणाशी बोललो नाही. माझ्याबद्दल नेत्यांना बोलायला गेलो नाही. बाकीच्यांशी बोलायचे सोडा. तो माझा गुणधर्म नाही. आयुष्यात इतकी पदे मिळाली, ती न मागता मिळाली आहेत. मला कुणीही विचारलेले नाही. मात्र, माझे नाव भाजपने जाहीर केल्यास मी लढणार आणि जिंकणार, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी आज जाहीर केली.
उदय सामंत यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक घेतली याकडे लक्ष वेधले असता राणे म्हणाले, बैठक घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आम्हीही उद्या बैठक बोलावली आहे. आमच्या कोकणात दहीकाले असतात, त्यात उदयचा दहिकाला तिकडे आणि आमचा इकडे आहे. परंतु संकासुर कोण आहे, हे मला माहीत नाही. आमची कोकणात ताकद आहे म्हणून हा मतदारसंघ आम्ही सोडणार कसा? असा सवाल त्यांनी केला. तिथे सध्या असलेला खासदार विनायक राऊत हे शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत का? असाही सवालही त्यांनी उपस्थित केला.
जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती भाजपच्या आहेत. जिल्हा बँक भाजपची आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा ही भाजपचीच आहे. शिंदे शिवसेनेला रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात उमेदवारी दिली गेली तर काय भूमिका असेल? यावर, भाजप नेहमी युती धर्म पाळतो. मी कुठेही असलो तरी 99 टक्के नाही, तर 100 टक्के असतो. शिंदे शिवसेनेला उमेदवारी दिली गेली तर आपण आदेशाचे पालन करू, असेही राणे यांनी स्पष्ट केले. भाजपकडे डझनभर क्षमता असलेले उमेदवार आहेत. कुणालाही उमेदवारी मिळाली तरी त्याचे काम करू, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. उद्या आपण सिंधुदुर्गात जावून शक्तीप्रदर्शन करणार का? किंवा प्रचाराचा नारळ फोडणार का? असा सवाल केला असता राणे यांनी पक्षाचे आदेश आल्यावरच नारळ फोडू तोवर नाही, असे सांगितले.
जळगावचे खासदार उन्मेश पाटील हे उध्दव ठाकरे यांना भेटायला गेले यावर बोलताना राणे म्हणाले, भाजपने उमेदवारी नाकारली म्हणून ते तिकडे गेले असतील, तर पडायला कुणीतरी ठाकरे यांना हवाच असतो. आता ठाकरे यांच्याकडे पाच खासदार आहेत. या निवडणुकीत ते शून्यावर येतील. असे असताना ठाकरे तडीपारची भाषा करत आहेत. मुख्यमंत्रीपदावर काम करताना त्यांनी काय केले? एक तरी बैठक घेतली का? केवळ राजकारण केले. कोरोना साथीच्या काळात सगळी वृत्तपत्रे अडचणीत असताना दै. सामना मात्र फायद्यात होता. उध्दव ठाकरे यांनी कुणाला मारलं तरी का? मी नगरसेवक असताना 32 गुन्हे माझ्यावर दाखल होते. आता येणार्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे यांचे केवळ पाच ते दहा आमदार असतील. लोकसभा निवडणुकीनंतर संजय राऊत सुध्दा पक्ष सोडून निघून जातील. नाहीतरी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात मी अनेकदा संजय राऊत यांना बघितले आहे. संजय राऊत हे शरद पवार यांच्याशी प्रामाणिक आहेत अशी टीकाही त्यांनी ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर केली. शंकर कांबळी यांना उमेदवारी डावलून दुसर्या एका उद्योगपतीकडे काम करणार्याला पैसे घेवून उध्दव ठाकरे उमेदवारी देण्याचा प्रयत्न करत होते, या आरोपाबरोबरच राणे यांनी उध्दव ठाकरे यांचा पोषाख आणि आर्थिक मुद्यांवर कडवी टीका केली.
राहुल गांधी हे कुठल्या अँगलने राजकीय नेते वाटतात? असा सवाल करत नितीन गडकरी रोड बनवत आहेत आणि त्यावर चालत राहुल गांधी रोड तपासत आहेत, अशी टीका त्यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर केली. रामलीला मैदानावर जे नेते जमले होते त्यांच्यापैकी एकाच्याही चेहर्यावर केजरीवाल यांना अटक केल्याचे दु:ख दिसत नव्हते. केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराचे समर्थन राहुल गांधी करत आहेत, असा आरोपही राणे यांनी केला. दारूण पराभवाच्या भीतीने इंडिया आघाडीचे नेते बेताल बडबड करत होते. त्यांच्याकडे पराभवाची गॅरंटी असल्याची टीकाही त्यांनी केली.
राणे यांनी सामंत यांचा या मतदारसंघावरील दावा धुडकावून लावला. सामंत यांचे त्या मतदारसंघात किती लोक आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एवढेच नव्हे, तर त्यांच्याकडे उमेदवार कोण आहे? असा प्रश्न त्यांनी पत्रकारांनाच विचारला. किरण सामंत यांचे नाव पत्रकारांकडून पुढे येताच त्यांनी अरे बापरे असे म्हणत हात जोडले आणि तिथे जाऊन जरा माहिती घ्या, असेही पत्रकारांना सांगितले. आपणास उमेदवारी नाही मिळाली नाही, तर आपण इतर भाजपचे काम करणार नाही, अशी भूमिका किरण सामंत यांनी घेतली असल्याकडे लक्ष वेधले असता, कुणीही उभा राहो, काहीही फरक पडत नाही. मी जिल्ह्यात असताना त्यांनी बाहेर येऊन बोलावे, त्यासाठी मी जिल्ह्यात गेल्यानंतर आपण पत्रकारांनी त्यांना फोन करून सांगावे? असा इशाराही राणे यांनी सामंत यांना दिला.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात कुणाचे वजन आहे हे दिल्लीतील पक्ष नेत्यांना माहीत आहे. यापूर्वी मी जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन सर्व माहिती त्यांना दिली आहे आणि माझा माझ्या नेत्यांवर विश्वास आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.