विश्वजित कदम यांचा काँग्रेस बैठकीवर बहिष्कार; सांगली लोकसभा जागेबाबत आग्रही | पुढारी

विश्वजित कदम यांचा काँग्रेस बैठकीवर बहिष्कार; सांगली लोकसभा जागेबाबत आग्रही

सांगली; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीतर्फे सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या जागेचा निर्णय होत नाही, तोपर्यंत काँग्रेसच्या राज्य बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा काँग्रेसचे नेते व माजी मंत्री आ. विश्वजित कदम यांनी मंगळवारी दिला. सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शिवसेना ठाकरे गटातर्फे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा झाली आहे. या उमेदवारीवर उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत ठाम आहेत. खासदार राऊत यांनी बुधवारी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांची यादी जाहीर होईल, त्यात सांगलीसह सर्व उमेदवार जाहीर होतील, असे सांगितले.

दुसर्‍या बाजूला काँग्रेसचे नेते या जागेविषयी आग्रही आहेत. सांगलीच्या जागेबाबत निर्णय होत नसल्याने आमदार कदम यांनी मुंबईत
बुधवारी (दि. 3) होणार्‍या काँग्रेसच्या प्रचार समितीवर बहिष्कार टाकला आहे. त्याबाबतचे पत्र महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठवले आहे. पत्रात म्हटले आहे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे 30 मार्च रोजीचे काँग्रेस राज्य प्रचार समितीच्या निवडीचे व बैठकीचे पत्र मला मिळाले. आपण माझी प्रचार समितीच्या सदस्यपदी निवड केली त्याबद्दल मी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला व आपला मनापासून आभारी आहे. राज्यात लोकसभा निवडणूक ही काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी म्हणून आपण सर्वजण ताकदीने लढवणारच आहोत.

माझी व सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची सांगली लोकसभेच्या जागेबाबतीत असणारी भावना आपण जाणता. गेल्या काही दिवसांपासून सांगली व राज्यातील इतर काही लोकसभेच्या जागांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. काँग्रेस पक्ष सांगली लोकसभेची जागा लढवण्यास सक्षम आहे. या भूमिकेवरती मी व सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते आज ही ठाम आहे. अद्यापही सांगली लोकसभा जागेबाबतीत काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीने एकत्रितपणे आम्हाला कोणताही निर्णय कळविलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता व आमदार म्हणून मी या बैठकीस अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Back to top button