Lok Sabha Election 2024 | दिंडोरीची लढत तिरंगी होण्याची शक्यता | पुढारी

Lok Sabha Election 2024 | दिंडोरीची लढत तिरंगी होण्याची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून विद्यमान खासदार केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीने भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, भाजपकडून २००४ ते २०१९ असे सलग तीन वेळा खासदार झालेले हरिश्चंद्र चव्हाण आता अपक्ष लढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे दिंडोरीची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.

चव्हाण यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र यात त्यांना अपयश आले. राष्ट्रवादीने येथून भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली आहे. शेवटी पर्याय शिल्लक नसल्यामुळे हरिश्चंद्र चव्हाण हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. माजी खासदार चव्हाण २००४ पासून ते २०१९पर्यंत दिंडोरी मतदारसंघातून खासदार झाले होते. मात्र, २०१९ मध्ये त्यांना डावलून भारती पवार यांना तिकीट देण्यात आले. चव्हाण समर्थकांना हे पटले नसल्याने त्यांनी आता चव्हाणांना उमेदवारीसाठी गळ घातली आहे.

मतदारसंघाचे यापूर्वी प्रतिनिधित्व केले असल्याने लोकांना काम करण्याची पद्धत माहीत आहे. मला उमेदवारी मिळावी या लोकांच्या भावना आहेत. २०१९ मध्ये सलग चौथ्यांदा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची चालून आलेली संधी हिरावून घेण्यात आली होती. त्यामुळे अपक्ष उमेदवारी करावी, अशी गळ जनतेने घातली आहे. – हरिश्चंद्र चव्हाण, माजी खासदार.

हेही वाचा:

Back to top button