कोरेगाव पार्क भागातील दर चढेच; रेडीरेकनरच्या दरात वाढ नाही

कोरेगाव पार्क भागातील दर चढेच; रेडीरेकनरच्या दरात वाढ नाही

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने रेडीरेकनरच्या दरात या वर्षी कोणतीही वाढ केली नाही. यामुळे मागील वर्षीचेच दर येत्या वर्षात (2024-25) लागू असणार आहेत. असे असले तरी नेहमीप्रमाणे शहरातील कोरेगाव पार्क भागाने सर्वाधिक दर असण्याची परंपरा कायम राखली आहे. शहरातील मेट्रो प्रकल्पामुळे विष्णूशास्त्री चिपळूणकर (विधी महाविद्यालय) रस्त्यालगत असलेल्या कांचन गल्ली, अशोक पथ परिसर हा भाग दुसर्‍या क्रमांकावर आहे. तिसर्‍या क्रमांकावर प्रभात रस्त्यावरील काशिनाथशास्त्री अभ्यंकर रस्ता (गल्ली क्रमांक 15) आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय या मेट्रो मार्गावरील पौड रस्ता आणि कर्वे रस्ता या परिसरातील दर हे तेजीत आहेत.

कोरेगाव पार्क आणि प्रभात रस्ता या परिसरातील दर नेहमी रेडीरेकनरच्या दरात आघाडीवर असतात. कोरेगाव पार्कमधील रेल्वे ओव्हर ब्रीज ते बंडगार्डन पूल हा भाग दरामध्ये पहिल्या स्थानावर असतो. या भागातील दर प्रतिचौरस फूट दर 16 हजार रुपयांच्या आसपास आहेत. वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गात मेट्रो धावू लागल्याने या मार्गालगत असलेल्या प्रभाग रस्ता, विधि महाविद्यालय रस्त्यांबरोबरच कर्वे रस्ता आणि पौड रस्त्यावरील दर चढे आहेत. विधि महाविद्यालय रस्त्यालगत असलेल्या कांचनगल्ली, अशोक पथ परिसरात दर हे 15 हजार 288 रुपये प्रतिचौरस फूट आहेत.

तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या प्रभात रस्त्यावरील काशिनाथ शास्त्री अभ्यंकर रस्ता (गल्ली क्रमांक 15) या भागातील दर 14 हजार 312 रुपये प्रतिचौरस फूट आहेत. आयकर रस्त्यावरील दर हे 13 हजार 718 रुपये प्रतिचौरस फूट आहेत. मेट्रो सुरू झालेल्या कर्वे रस्त्यावरील रेडीरेकनरचे दर चढे आहेत. या ठिकाणचे दर प्रतिचौरस फूट 13 हजार 835 रुपये आहेत. पौड रस्त्यावरील दर 11 हजार 485 रुपये आहे. तसेच, कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी ते गरवारे महाविद्यालयापर्यंतचे दर 12 हजार 830 रुपये आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news