स्वामीजीं च्या आग्रही भूमिकेमुळे भाषावार पुनर्रचना सोपी झाली, कदाचित स्वामीजी लोकसभेत गेले नसते तर भाषावार विषयाला आणखी फाटे फुटले असते. पुनर्रचनेचे महत्त्वाचे काम झाल्यानंतर त्यांनी नेहरूंकडे राजकीय निवृत्तीचा मनोदय बोलून दाखविला. नेहरूंनी त्यास जड अंतकरणाने मान्यता दिली. त्यानंतर स्वामीजी कोणतीही निवडणूक लढले नाहीत. खादीचा प्रचार, भूदान, शैक्षणिक कामाला त्यांनी वाहून घेतले. एक कांबळी, भगव्या कपड्याचा एक जोड आणि पायातील चप्पल यांशिवाय त्यांची स्वत:ची अशी काहीच मालमत्ता नव्हती. त्यांच्या मनावर सूरदासांच्या काव्याचे संस्कार होते. चिंतन, मनन, वाचन यांतून ते नेहमी विद्यार्थी व इतरांशी संवाद साधत. ते आदर्श विद्यार्थी, प्रयोगशील शिक्षक, आदर्श सल्लागार, संसदसदस्य, राजकारणी, सन्यस्त स्वातंत्र्य सेनानी होते.(संदर्भ : मराठी विश्वकोश)