चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटाने शेतकरी पुरता घाईकुतीस आला आहे. वेळोवेळी येणाऱ्या संकटाने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. त्याचा परिणाम आर्थिक, सामजिक, शैक्षणिक सोबतच वैयक्तिक जीवनावरही होत आहे. संकटाची मालिका बळीराजाच्या जीवनात पाचवीला पुजलेली आहे. असंख्य संकट, अडचणी आल्या तरी शेतकरी दरवर्षीच्या हंगामाला पुन्हा न डगमगता उभा राहत आहे. (Youth Marriage) अशाच चंद्रपूर जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांच्या मुलांची भावी वधू शोधण्यासाठी यात्रामध्ये हातात फ्लेक्स बोर्ड भटकंती सुरू आहे. "शेतकरी नवरा नको गं बाई" म्हणत शेतकऱ्यांच्या मुलांना वर म्हणून नाकारणाऱ्या दोन युवकांची चर्चा गावागावांमध्ये सुरू आहे. मंगेश बुरडे आणि सुरज लोखंडे त्यांचे नाव आहे.
चिमूर तालुक्यातील मांगली कोमटी गावातील रहिवासी असलेल्या मंगेश बुरडे आणि सुरज लोखंडे यांचा वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय आहे. आई वडिलांचे आयुष्य शेतीमध्ये राबण्यात गेले. मुलेही मोठी झाल्यानें आई वडिलांना शेतीसाठी हातभार लावून शेती व्यवसायाकडे वळले. दोघेही मित्र असलेल्या तरुणांनी दोन वर्षापूर्वी विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. काही मुलींना त्यांनी पाहणी केली, परंतू शेतकऱ्यांपेक्षा नोकरीवाला मुलगा अशीच पसंती पुढे आल्याने त्यांना मुलींनी पसंत केले नाही. नोकरी आहे का ? दाेघांनीही शेतीमध्ये काम करायचे नाही? आदी अटी भावी वधूकडून घालण्यात येत आहेत. त्यामुळे "शेतकरी नवरा नको ग बाई" अशी पसंती भावी वधुंची दिसून येत आहे.
दोन वर्षापासून सतत शेतकऱ्यांचा मुलगा आणि शेती व्यवसाय असल्याने विवाहात अडचणी येवू लागल्याने मंगेश बुरडे आणि सुरज लोखंडे यांनी वधू शोधण्यासाठी एक अफलातून फंडा सूरु केला आहे. सध्या उन्हाळाची चाहूल लागलेली आहे. प्रसिद्ध ठिकाणी यात्रा सूरू आहेत. याच यात्राचे ठिकाणी दोन्ही तरुणांनी डोक्याला लग्नाचा टोप घालून हातात फ्लेक्स बोर्ड घेवून विवाहासाठी मुलगी पाहिजे म्हणुन वधुंचा शोध सूरू केला आहे.
चिमुरात बालाजीची प्रसिद्ध घोडा यात्रा भरली आहे. याचं ठिकाणीं त्यानी वधूसाठी सार्वजानिक ठिकाणी लोकांना आवाहन केले आहे. काम नाहीं केले तरी चालेल; पण मुलगी पाहिजे म्हणुन त्यांनी गळ घातली आहे. यात्रेमध्ये हातात फ्लेक्स बोर्ड घेवून वधूशोध कार्य सुरु केले आहे. या अफलातून प्रकाराचा यात्रेकरूंना धक्काच बसला. अनेकांनी तरुणांची खिल्ली उडवली. मात्र शेतकऱ्यांना वधूसाठी खटाटोप करावा लागणे अत्यंत चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया काही यात्रेकरूनी व्यक्ती केली आहे. त्यानी आतापर्यंत गोंदेडा गुंफा यात्रा, भिसी, उमरेड या ठिकाणी वधुसाठी असेच प्रयत्न सूरु केले आहे.
शिकलेला तरूण शेतकरी बनण्यासाठी पुढे येत नाही. परंतु या दोन्हीं तरुणांना शेतकरी असल्याचा अभिमान आहे. आता मुलगी मिळो की न मिळो, हातात फ्लेक्स बोर्ड घेवून व्यापक जनजागृती करून शेतकरी मुलांबद्दल असलेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न सुरु ठेवण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे.
हेही वाचा