Lok Sabha Election 2024 : सांगलीत भाजप, काँग्रेसला समान संधी | पुढारी

Lok Sabha Election 2024 : सांगलीत भाजप, काँग्रेसला समान संधी

सांगली : उध्दव पाटील : 
सांगली लोकसभा मतदारसंघात भाजप विजयाची हॅ‌ट्ट्रिक करण्याच्या तयारीत आहे, तर गमावलेला बालेकिल्ला पुन्हा जिंकण्यासाठी काँग्रेसने हालचाली गतिमान केल्या आहेत. ‘हार-जीत’ची समान संधी महायुती आणि महाविकास आघाडी यांना आहे. उमेदवारीवरून गटबाजी उफाळणार नाही, याची दक्षता भाजप कशी घेणार, हे महत्त्वाचे ठरेल. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे युवा नेते डॉ. विश्वजित कदम यांची भूमिका काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (Lok Sabha Election 2024)

महायुतीकडून भाजपतर्फे खासदार संजय पाटील तिसऱ्यांदा उमेदवारीसाठी आणि तिसऱ्यांदा विजयासाठी कामाला लागले आहेत. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी इच्छुक असल्याचे जाहीर केल्यामुळे व पक्षातीलच एका गटाची कुमक त्यांच्या पाठीशी असल्याने भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, तरीही भाजपची उमेदवारी मिळविण्यात खासदार संजय पाटील बाजी मारतील, असे चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा काँग्रेसला जाणार, हे जवळपास स्पष्ट आहे. सांगलीतून कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील उमेदवार असतील, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या सांगली दौ-यावेळी स्पष्ट केलेले आहे. तरीही जागा वाटपात ‘कोल्हापूर’च्या बदल्यात ‘सांगली’, असा पवित्रा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याची चर्चा आहे. ही अगदी ताजी घडामोड आहे.  निवडणूक आचारसंहिता लागू होण्यास काही दिवसच उरले असताना, उमेदवारीवरून महायुती आणि महाविकास आघाडीत संभ्रम कायम दिसत आहे.

Lok Sabha Election 2024 : सांगली मतदारसंघ  काँग्रेसचा बालेकिल्ला

लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत ‘मोदी लाट जोरात होती. मूळचे काँग्रेसचे नेते व नंतर राष्ट्रवादीत गेलेले संजय पाटील यांनी या निवडणुकीत भाजपचे कमळ हाती घेतले. लोकसभेचा सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला; मात्र भाजपचे उमेदवार संजय पाटील यांनी तब्बल २ लाख ३९ हजार मतांनी काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय मंत्री प्रतीक प्रकाशबापू पाटील यांचा पराभव केला. लोकसभेची २०१९ ची निवडणूकही अतिशय चुरशीने झाली. भाजप-शिवसेना युती, स्वाभिमानी – काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी काटा लढत झाली. या निवडणुकीत जिल्ह्याने उघड जातीय संघर्षही अनुभवला. भाजपचे उमेदवार संजय पाटील १ लाख ६४ हजार इतक्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

सन २०२४ ची निवडणूक दुरंगी, चुरशीने होईल, असे चित्र दिसत आहे. महायुती (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी) विरुद्ध महाविकास आघाडी (काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशरद पवार – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात होणार आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनीही स्वतःची अपक्ष उमेदवारी जाहीर करून रंगत आणली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीसाठी चाचपणी केली होती. कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्याच्या बदल्यात सांगलीची जागा ठाकरे यांच्या शिवसेनेने मागितल्याची चर्चा आहे. मात्र, ठाकरे यांच्या शिवसेनेकडे तगडा उमेदवार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. संघटनेचे नेते महेश खराडे हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत असणार, की स्वतंत्र लढणार, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक रिंगणात उभी ठाकली तरी, खरी लढत महायुती व महाविकास आघाडी यांच्यातच होणार, हे स्पष्ट आहे. खासदार संजय पाटील हे भाजपकडून लोकसभेसाठी पुन्हा इच्छुक आहेत. म्हैसाळ विस्तारित उपसा सिंचन योजना, टेंभू उपसा सिंचन योजना, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून ते आपले राजकारण नेटाने पुढे नेत आहेत. रांजणी ड्रायपोर्ट व कवलापूर विमानतळाच्या बाबतीत ते बॅकफूटवर गेले असले तरी, जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्यांचे मार्केटिंग त्यांनी जोराने सुरू केले आहे. लोकसभेत सलग तिसऱ्यांदा निवडून जाण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. मात्र यावेळीही त्यांना उमेदवारीसाठी पक्षातील नाराजांशी झगडावे लागत आहे. पक्षातील स्थानिक नेत्यांशी अनेकदा पंगा घेऊन त्यांनी त्यांची नाराजी ओढवून घेतली आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांचा तर त्यांच्याशी उभा दावा आहे. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याशीही त्यांचे सूर जुळल्याचे दिसत आहे. आमदार सुधीर गाडगीळ हे त्यांच्यापासून लांबही नाहीत आणि जवळही नाहीत, अशा स्थितीत आहेत. लोकसभेच्या २०१९ मधील निवडणुकीतही त्यांच्या उमेदवारीला पक्षातूनच मोठा विरोध झाला होता. आता २०२४ च्या निवडणुकीसाठी माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त करून उमेदवारीत चुरस निर्माण केली आहे. भाजपच्या निवडणूक निरीक्षकांनी सांगलीत येऊन गोपनीय बैठक घेऊन पक्षाचे पदाधिकारी, प्रदेश व जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशा १५७ जणांकडून उमेदवारीबाबत चाचपणी केली आहे. उमेदवारी चाचपणीचा हा फार्स असावा, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारी निश्चित केलेली आहे, अशी चर्चाही भाजपच्या वर्तुळातून ऐकू येत आहे.  महाविकास आघाडीकडून सांगलीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला मिळावी, यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रयत्न केले. मात्र, ही जागा काँग्रेसकडेच राहील हे स्पष्ट आहे. उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे पाहन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी मतदारसंघात नेते, कार्यकर्ते, मतदारांच्या गाठीभेटीची एक फेरी पूर्ण केली आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कॉंग्रेसचे युवा नेते माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी तन, मन, धनाने प्रयत्न केल्यास महाविकास आघाडी या निवडणुकीत विजयाच्या समान संधीपर्यंत येऊ शकते.

लोकसभा निवडणूक एक दृष्टिक्षेप…

२०१४
• भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना मिळालेली मते : 6,11,563
• काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांना मिळालेली मते : 3,72,271
• भाजपचे संजय पाटील 2,39,292 मताधिक्याने विजयी

२०१९
• भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना मिळालेली मते : 5,08,995
• स्वाभिमानी-काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार विशाल पाटील यांना मिळालेली मते: 3,44,643
• वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना मिळालेली : 3,00,234
• भाजपचे संजय पाटील 1, 64,352 मताधिक्याने विजयी

 

हेही वाचा 

Back to top button