आयोग नेमून मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण समोर आणावे लागेल : संभाजीराजे | पुढारी

आयोग नेमून मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण समोर आणावे लागेल : संभाजीराजे

नवी दिल्‍ली, पुढारी वृत्तसेवा : सामाजिक मागासलेपण सिद्ध झाल्याखेरीज मराठा समाजाला आरक्षण ( Maratha reservation ) मिळणार नाही. त्यामुळे आयोग नेमून मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण समोर आणावे लागेल, असे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज स्‍पष्‍ट केले. मराठा आरक्षण हा तांत्रिक परंतु अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असल्याने यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन युद्धपातळीवर हालचाली कराव्‍यात, असे आवाहनही त्‍यांनी केले.

जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांवर झालेला लाठीमार आणि या घटनेचे राज्यभरात उमटलेले तीव्र पडसाद, या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी यांनी आज (दि.५) दिल्लीत पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, मनोज जरांगे-पाटील दरवर्षी आंदोलन करतात. यावर्षी आंदोलनामध्ये काय घडले हे सर्वज्ञात आहे. त्यांच्या मागण्यांबाबत मराठा समाजाची जी भूमिका असेल तीच भूमिका आपलीही असेल; परंतु, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, मराठा समाज पुढारलेला समाज आहे, सामाजिकदृष्या मागास नाही. सामाजिक दृष्ट्या मागास असल्याखेरीज आरक्षण मिळू शकत नाही. त्यामुळे आरक्षणासाठी सर्वप्रथम आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण सिद्ध करावे लागेल. आपली भूमिका नेहमीच मराठा समाजाच्या बाजूने राहिली आहे. परंतु हा तांत्रिक व महत्त्वाचा मुद्दा आहे, असेही छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.

आरक्षणासाठी वेगवेगळे निकष

सरकारने अनेक महिन्यांपूर्वी समिती स्थापन केली होती. या समितीला आपण वारंवार सूचना दिली होती की, आरक्षणासाठी वेगवेगळे निकष आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठी लक्ष द्यायला हवे होते. प्रत्यक्षात तसे झाले नाही, अशी नाराजी व्यक्त करताना छत्रपती संभाजी म्हणाले,की सरकार आणि मराठा समाजाची एक बैठक होणे गरजेचे आहे. मराठा समाजाची भावना आणि नेमकी तांत्रिक बाब यामध्ये समन्वय साधणे गरजेचे आहे. युद्धपातळीवर आयोग नेमून सामाजिक मागासलेपण सिद्ध करणे याकडेच सरकारने लक्ष द्यावे. पण हा मुद्दा सोडून सर्व नेतेमंडळी आपापल्या पद्धतीने आंदोलनावर बोलत आहेत, अशी नाराजीही छत्रपती संभाजी यांनी व्यक्त केली.
सर्वांच्या सूचना पुढे येतील आणि मार्ग निघू शकेल

गरीब मराठ्यांना न्याय देण्याची गरज आहे, सर्व पक्षांना हे मान्य आहे. आता सर्वांनी एकत्र यावे आणि आयोग नेमण्यासाठी चर्चा करावी. सर्वांनी एकत्र आल्याशिवाय यावर मार्ग निघणार नाही. यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी. त्यातूनच सर्वांच्या सूचना पुढे येतील आणि मार्ग निघू शकेल, असा विश्‍वासही छत्रपती संभाजीराजे यांनी व्‍यक्‍त केला.

केंद्रात असो की राज्यात असो आरक्षण द्या, म्हणजे झाले

राज्य सरकार आरक्षण देण्यासाठी समर्थ असल्याच्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर टिप्पणी करताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले, की असे असेल तर स्वागतच आहे. राज्यात आणि केंद्रात त्यांचेच सरकार आहे. त्यामुळे गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे. केंद्रात असो की राज्यात असो आरक्षण द्या, म्हणजे झाले.

हेही वाचा : 

Back to top button