नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जालन्याच्या घटनेकडे संवेदनशीलपणे बघत असून, या घटनेची चाैकशी होऊन सत्य बाहेर यायला पाहिजे. मराठा आरक्षणाला ओबीसींचा पाठिंबा असून, संविधानिक दृष्टीने मराठा आरक्षण दिले पाहिजे, असे सूतोवाच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सोमवारी (दि. ४) केले.
शिवशक्ती दर्शन यात्रेला लोकांकडून अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद लाभत असल्याचे मुंडे यांनी दै. 'पुढारी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले. यात्रेदरम्यान, महाराष्ट्रातील शक्तिस्थळे व शक्तिपीठांचे दर्शन त्या घेणार आहेत. मुंडे यांच्या यात्रेने कोपरगावमार्गे नाशिक जिल्ह्यात प्रवेश केला. मुंडे म्हणाल्या की, दाैऱ्याच्या तयारीत असल्याने जालना घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली विधाने पाहिली नाहीत. परंतु, घटनेनंतर गृहमंत्री म्हणून फडणवीस यांच्यावर टीका होत असेल. आरक्षणावर आमची भूमिका स्पष्ट आहे. आहे ते आरक्षण का टिकवू नये, असे मत व्यक्त करताना आमची भूमिका बदलण्याने काही होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवशक्ती यात्रा ही संघर्ष कन्येची यात्रा आहे का? असा प्रश्न विचारला असता, मुंडे यांनी स्वर्गीय गोपनाथ मुंडे आणि मी दोघांनी संघर्ष केला आहे. आम्हाला संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळाले नसल्याची भावना मुंडे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील शक्तिस्थळ आणि शक्तिपीठांचे आपण दर्शन घेणार आहे. यात्रेत लोक फुलं उधळून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. माझ्याकडून लोकांच्या अपेक्षा आहेत. मात्र, त्यांना देण्यासाठी माझ्याकडे काहीच नसून मी केवळ लाेकांची भेट घेत असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी सायंकाळी सप्तशृंगगड येथे सप्तशृंगीदेवीचे दर्शन घेतले. परतीच्या प्रवासात दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्राला भेट दिली. मंगळवारी (दि. ५) सकाळी 7 ला श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे त्या दर्शन घेणार आहे. तेथून नांदूरशिंगोटे (ता. सिन्नर) येथील स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकात अभिवादन करतील. त्यानंतर श्री क्षेत्र भीमाशंकरकडे त्या प्रयाण करणार आहेत.
अजून काही ठरले नाही
भाजपने लोकसभेसाठी आपल्याला संधी दिल्यास आपण उमेदवारी करणार का? असा प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारला असता, लोकसभा व विधानसभा असा कुठलाही प्रश्न नाही. तसेच पक्षाकडून संधी दिली, तर हा विषय वेगळा आहे. त्यावर आताच मी काही बोलणे योग्य नसल्याचे सांगत मुंडे यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले.
हेही वाचा :