भरतीचा वांदा तरीही गुरुजी व्हायचंय यंदा !! | पुढारी

भरतीचा वांदा तरीही गुरुजी व्हायचंय यंदा !!

गणेश खळदकर

पुणे : राज्यात 2012 पासून बंद असलेली शिक्षकभरती 2018 ला सुरू झाली. परंतु, 2012 ते 2023 या तब्बल 11 वर्षांच्या कालखंडात शिक्षकी पेशात केवळ सहा ते सात हजार शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. दरवर्षी किमान 50 हजारांवर विद्यार्थी शिक्षकाची पात्रता पूर्ण करीत असल्याचे दिसून येत आहे. यंदा तब्बल 52 हजार 941 विद्यार्थ्यांना शिक्षक व्हायचे आहे. त्यामुळे शिक्षकभरतीचा पत्ता नसताना अनेकांना गुरुजी व्हायचे असल्याचे नोंदणीवरून दिसते. राज्यात 2018 ते 2023 या पाच वर्षांत साडेबारा हजार शिक्षकभरतीच्या केवळ वल्गनाच झाल्या. प्रत्यक्षात शिक्षकांच्या केवळ सहा हजारांवर जागा भरण्यात आल्या.
त्यातच 30 हजार शिक्षकभरतीची नवी घोषणा करण्यात आली. त्यासाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात आली. तरीदेखील शिक्षकभरतीबाबत कोणतीही हालचाल शिक्षण विभागाकडून झाली नाही. त्यामुळे पहिलीच भरती अर्धवट असताना नव्याने शिक्षक भरतीचे गाजर कशासाठी? असा प्रश्न शिक्षकभरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी विचारला आहे.  2018 साली झालेल्या अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीतील उमेदवार शिक्षकभरतीसाठी पात्र असतानाही नव्याने अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात आली. त्याचा निकाल जाहीर करण्यात आला तसेच शिक्षकभरतीचे वेळापत्रकदेखील जाहीर करण्यात आले.
परंतु, संचमान्यतेमध्ये आहे तेच शिक्षक अतिरिक्त ठरत असल्याचे धक्कादायक  वास्तव उघडकीस आले. त्यामुळे नव्याने शिक्षकभरती करण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षकभरतीसाठी पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेले किमान 3 लाखांहून अधिक उमेदवार शिक्षकभरतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे नव्याने शिक्षक होऊ घातलेल्या उमेदवारांचे नेमके काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, यंदा बी. एड्. अभ्यासक्रमासाठी तब्बल 52 हजार 941 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर 50 हजार 148 विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले आहेत. बी. पी. एड्.साठी 6 हजार 903 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, 6 हजार 556 विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले आहेत.
पुरेसे शिक्षक नसल्याने येत असलेल्या अडचणी 
विद्यार्थ्यांना विविध विषयांचे शिक्षक मिळत नाहीत.
शालेय शिक्षणाचा दर्जा ढासळत चालला आहे.
संस्थाचालक आहे त्या शिक्षकांना वेठबिगारासारखे राबवून घेत आहेत.
पात्रताधारक शिक्षकांची शाळांमध्ये वानवा.
शिक्षकांना शिक्षणापेक्षा शिक्षणेतर उपक्रमांकडे लक्ष द्यावे लागते.
वय वाढत असल्यामुळे आणि शिक्षकभरती होत नसल्यामुळे उमेदवार नैराश्यग्रस्त.
बी. एड्.च्या विद्यार्थ्यांना पहिलीपासून बारावीपर्यंत शिक्षक होण्याची संधी नवीन शैक्षणिक धोरणानुसार निर्माण झाली आहे. त्यामुळे
बी. एड्.कडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. किमान खासगी शिकवण्या तरी घेता येतील. याचा विद्यार्थी विचार करतात. परंतु, शासनाकडून शिक्षकभरतीच्या वल्गना करण्यात येत असल्या, तरी संचमान्यता झाल्यानंतर शिक्षकभरतीचा फुगा फुटण्याची शक्यता आहे.  
                                                                                      – संतोष मगर, संस्थापक-अध्यक्ष, 
डीटीएड-बीएड स्टुंडट असोसिएशन मध्यंतरी शिक्षकभरती प्रक्रिया पूर्णपणे थंडावली होती. परंतु, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकभरती होत आहे. तसेच 2012 पासून शिक्षकभरती नसल्याने मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत. शासनाच्या वेगवेगळ्या घोषणांपैकी मोठ्या प्रमाणावर शिक्षकभरती केली जाईल, असे आश्वासक चित्र समोर येत आहे. याचाच परिणाम म्हणून या वर्षी शिक्षक होण्यासाठी डी. एड्. आणि बी. एड्. प्रवेशासाठी पदवीधारकांचा मोठ्या प्रमाणावर ओढा दिसत आहे.
                                                                          – महेंद्र गणपुले, प्रवक्ते,  मुख्याध्यापक महामंडळ
हेही वाचा :

Back to top button