

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गौरी-गणपती आणि दिवाळी सणानिमित्त राज्य शासन 'आनंदाचा शिधा' देणार आहे. गणेशोत्सवाच्या शिध्याचे एक सप्टेंबरपासून तर दिवाळीच्या शिध्याचे 15 ऑक्टोबरपासून वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यातील 5 लाख 47 हजार 812 कुटुंबांना याचा लाभ होणार आहे.
सणासुदीला एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चणाडाळ आणि एक किलो खाद्यतेल असा चार वस्तूंचा संच 'आनंदाचा शिधा' म्हणून शंभर रुपयांत देण्याचा निर्णय राज्य शासनाने यापूर्वी घेतला आहे. त्यानुसार गेल्यावर्षी दिवाळीला, त्यानंतर गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हा शिधा वाटप झाला. आता गौरी-गणपती उत्सवानिमित्त आणि दिवाळीलाही हा शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
गौरी-गणपती उत्सवासाठी देण्यात येणारा शिधा दि.1 सप्टेंबरपासून वाटप करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने सर्व जिल्हा पुरवठा अधिकार्यांना दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी नियुक्त केलेल्या एजन्सीकडून जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या संख्येनुसार संच मागणी करणे, आलेले संच, त्यातील वस्तूंचा दर्जा, वचन आदी तपासून घेणे, दुकानदारांपर्यंत सुरक्षित वाहतूक करणे आदींसह या आनंदाचा शिधाचे वितरण करण्याची कार्यपद्धती गुरूवारी राज्य शासनाने जाहीर केली आहे. यानूसार दिलेल्या सूचनांची अमंलबजावणी करून दि.1 सप्टेंबर ते दि.30 सप्टेंबर या कालावधीत हे वाटप पूर्ण करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.
गौरी-गणपती उत्सवाबरोबर नोव्हेंबर महिन्यात येणार्या दिवाळी सणासाठीही आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. त्याचेही वाटप दि.15 आक्टोंबर पासून सुरू करण्यात येणार असून, त्याचे नियोजनही आतापासूनच करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गतवर्षी दिवाळी झाल्यानंतर आनंदाचा शिधा नागरिकांच्या हाती पडला होता, यावर्षी तो सणासुदीतच उपलब्ध व्हावा, यासाठी शिधा वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्यातील 1 कोटी 57 लाख 21 हजार 629 कुटूंबाना आनंदाचा शिधा सप्टेंबर आणि आक्टोंबर या दोन महिन्यात दोन वेळा वाटप केला जाणार आहे. याचा जिल्ह्यातील 5 लाख 47 हजार 812 कुटूंबांना लाभ होणार आहे. राज्य शासनाच्या सूचनांनूसार शिधा वाटपाचे पुरवठा विभागाने जिल्ह्यातील नियोजन सुरू केले आहे.