निसर्गाच्या कोपाने गाडलेल्या माळीणला 9 वर्षे पूर्ण | पुढारी

निसर्गाच्या कोपाने गाडलेल्या माळीणला 9 वर्षे पूर्ण

अशोक शेंगाळे

भीमाशंकर : तब्बल 9 वर्षांपूर्वीची घटना… 30 जुलै 2014 ची सकाळ, रात्रभर पडलेल्या पावसामुळे साचलेले पाणी, डोंगराला पडलेल्या भेगांमध्ये साठून डोंगराचा कडा कोसळला. प्रचंड आवाज आणि चिखलाचा मोठा लोंढा गावच्या दिशेने वेगाने आला. डोंगरावरील झाडे भिंगरीसारखी उडत खाली आली. अचानक घडलेल्या या घटनेने कोणालाही सावरण्याची संधीही मिळाली नाही. काही सेकंदांत संपूर्ण गावच ढिगार्‍याखाली गाडले गेले आणी या दुर्घटनेत 151 लोक मृत्युमुखी पडले. निसर्गाच्या कोपाने डोंगराचा कडा कोसळून गाडल्या गेलेल्या दुर्दैवी माळीणच्या घटनेला 30 जुलै रोजी 9 वर्षे पूर्ण झाली.

30 जुलै 2014 रोजी डोंगराने अख्खं माळीण गाव गिळंकृत केले. या दुर्घटनेत 44 कुटुंबांतील 151 लोक दगावले. 9 जण वाचले तर 39 लोक बाहेरगावी असल्याने बचावले. प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य राबविले. या दुर्घटनेत बचावलेल्या लोकांसाठी तात्पुरते पत्र्याचे निवारा शेडमध्ये पुनर्वसन करण्यात आले. त्यानंतर आंमडे गावच्या हद्दीत नवीन माळीण गाव बसवण्यात आले. येथे 68 घरे बांधण्यात आली. 1 एप्रिल 2017 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नव्या गावाचा लोकार्पण सोहळा झाला. नवीन माळीणचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही सुटला नाही.

उन्हाळा व पावसाळ्याच्या सुरुवातीला अजूनही माळीणकरांना डोक्यावर हंडा घेऊन आसाणे येथून पाणी आणावे लागत आहे. स्मृतिस्तंभावर सावलीसाठी पत्र्याचे शेड व्हावे, हनुमान मंदिरासमोर सभामंडप व्हावा, अशी मागणी आहे. कमलबाई लेंभे व भीमराव झांजरे यांच्या घरांचा प्रश्न अजूनही तसाच आहे. जुन्या माळीणकडे शेतजमिनी आहेत. तेथे जाण्यासाठी नवीन गावठाणातून रस्ता करण्यात यावा, घरांचे छत पावसात गळतात त्याचेही काम झाले पाहिजे आदी मागण्या अजूनही प्रलंबितच असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
नवीन माळीण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत 1 ली ते 7 वीत 52 मुले-मुली शिक्षण घेत आहेत.

रोहित गणेश झांजरे हा मुलगा 9 वीला रयत शिक्षण संस्थेचे कृष्णा यशंवत भालचिम या माध्यमिक विद्यालय माळीण फाटा येथे शिक्षण घेत आहे. ‘आमचे घर हे जुन्या माळीण शाळेच्या शेजारी समोर होते. त्यामुळे मी आज आहे, पण मला ते आठवल्यावर भ्याव वाटतं,’ असे रोहितने सांगितले.

स्मृतिस्तंभाला पर्यटकांनी केला सेल्फी पॉईंट
आंंमडे गावच्या हद्दीत नवीन माळीण गाव वसवण्यात आले. जुन्या माळीण गावाच्या ठिकाणी दगावलेल्या 151 लोकांसाठी स्मृतिस्तंभ बांधण्यात आले. परंतु या ठिकाणी येणार्‍या पर्यटकांनी हा सेल्फी पॉईंट केला असल्याने पर्यकांनी आमच्या भावनेशी खेळू नये, आमच्या आठवणी, भावना या ठिकाणी दडल्या आहेत, अशी खंत येथील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

 हेही वाचा :

Eknath Khadase : जवळच्याच लोकांनी खटले भरून मला न्यायालय दाखवले! खडसेंनी मांडली भावना

अहमदनगर : झेडपीत 937 जागांची मेगाभरती!

Back to top button