

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी आज दि. 21 रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. संबंधित यादीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 21 ते 24 जूनदरम्यान महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे आज अकरावी प्रवेशाचे बिगुल वाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर 8 जूनपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानुसार अर्जाचा पहिला भाग भरण्यासाठी 12 जूनची, तर दुसरा भाग भरण्यासाठी 15 जूनची मुदत देण्यात आली होती. परंतु, दिलेल्या मुदतीत अनेक विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा पहिला भाग भरता आला नाही. त्यामुळे पहिला भाग भरण्यासाठी 14, तर दुसरा भाग भरण्यासाठी 17 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अकरावी प्रवेशाठी 324 महाविद्यालयांत 88 हजार 413 कॅपच्या तसेच 24 हजार 977 कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 1 लाख 13 हजार 390 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी कोटा प्रवेशाच्या 3 हजार 57 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, प्रवेशासाठी आता 1 लाख 10 हजार 333 जागा उपलब्ध आहेत. अकरावी प्रवेशाच्या नियमित फेरीसाठी 87 हजार 238 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 73 हजार 985 विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉक केले आहेत. यातील 34 हजार 704 विद्यार्थ्यांनी अर्ज अॅटो व्हेरिफाइड केले आहेत. तर 39 हजार 101 विद्यार्थ्यांनी पडताळणी केंद्रावर जाऊन अर्जांची पडताळणी केली आहे. तर 65 हजार 996 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत. त्यामुळे यातून किती विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश जाहीर होतो, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा :