पुणे महापालिकेत लवकरच तिसरी पदभरती | पुढारी

पुणे महापालिकेत लवकरच तिसरी पदभरती

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेने पहिली भरती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दुसर्‍या भरती प्रक्रियेच्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. त्यानंतर आता कार्यकारी आणि कनिष्ठ अभियंता पदाच्या 150 जागांसाठी तिसर्‍या भरतीचीही घोषणा केली आहे. यासाठी आकृतीबंधामध्ये बदल करण्याची परवानगी राज्य शासनाकडे मागण्यात येणार असल्याचेही महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेमध्ये सहा महिन्यांपूर्वी लिपिक, कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण निरीक्षक यांसारख्या अन्य पदांसाठी नोकर भरती झाली. तसेच येत्या दोन आठवड्यांमध्ये आरोग्य विभाग, अग्निशामक दलासह अन्य काही पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे.

यासाठीच्या परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. त्यानंतर आता तिसरी भरती प्रक्रिया राबविण्याचेही नियोजन केले आहे. यासंदर्भात माहिती देताना आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, 23 गावे समाविष्ट झाल्याने ग्रामपंचायतींचे काही कर्मचारी महापालिकेकडे वर्ग झाले आहेत. परंतु त्यांच्याकडे अभियंता हे पद नाही. यामुळे महापालिकेच्या आकृतीबंधामध्ये बदल करून अभियंत्यांची संख्या वाढवावी लागणार आहे. यासोबतच महापालिकेकडे नगरअभियंता पद तसेच अधीक्षक अभियंतापदापर्यंत जाण्यासाठी आवश्यक असलेले उमेदवार, त्यांचा सेवेतील उर्वरित कार्यकाल लक्षात घेता भविष्यात अनेक वरिष्ठ पदे रिक्त राहण्याची शक्यता आहे. यासाठी थेट कार्यकारी अभियंत्यांची भरती करण्यासाठी आकृतीबंधामध्ये बदल करावे लागणार आहेत. यासंदर्भातील पदसंख्या आणि आवश्यक बदलांचा अहवाल तयार करण्यात आला असून, लवकरच तो मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

Back to top button