महत्त्वाची बातमी ! अल-निनोबाबत मतभिन्नता ; भारतीय हवामान विभाग म्हणतो 1 जुलैपासून मान्सून सक्रिय | पुढारी

महत्त्वाची बातमी ! अल-निनोबाबत मतभिन्नता ; भारतीय हवामान विभाग म्हणतो 1 जुलैपासून मान्सून सक्रिय

आशिष देशमुख : 

पुणे : अल-निनो सक्रिय झाला आहे किंवा नाही, यंदाचा मान्सून सरासरीइतका तरी पडेल की नाही, याबाबत भारतीय अन् विदेशी हवामानतज्ज्ञांमध्ये मतभिन्नता दिसत आहे. भारतीय हवामान विभागातील शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार, अजून अल-निनो सक्रिय झालेला नाही. त्यामुळे मान्सून 1 जुलैपासून सक्रिय होईल. जागतिक हवामान संघटनेच्या म्हणण्यानुसार, अल-निनो जूनपासून सक्रिय झाला आहे. पण, हाच घटक मान्सूनच्या विलंबासाठी जबाबदार नाही. मात्र, इतर शास्त्रज्ञांच्या मते यंदा पाऊसमान कमीच राहून अवर्षणाच्या स्थितीची शक्यता संभवते.

दुसरा आठवडा संपला, तरीही मान्सून रत्नागिरीतून पुढे सरकलेला नाही. तो महाराष्ट्रात रत्नागिरीतच अडकलेला आहे. यंदा मान्सूनला झालेला उशीर शेतकर्‍यांची चिंता वाढवत आहे. त्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांची मते जाणून घेतली असता अल-निनोबाबत मतभिन्नता दिसून आली. यात तीन वेगवेगळी मते समोर आली. भारतीय हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांच्या मते, मान्सून 18 ते 22 जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापेल. मात्र, खरा जोर 1 जुलैपासून धरेल. मात्र, इतर शास्त्रज्ञांच्या मते, यंदा अल-निनो व बिपोर जॉय वादळाच्या प्रभावाने मान्सूनला खूप उशीर होईल व त्याचा परिणाम अवर्षणाची स्थिती निर्माण होण्यात होऊ शकतो, तर जागतिक हवामान संघटनेच्या मते अल-निनो हा जूनपासूनच सक्रिय झाला आहे.

जागतिक हवामान संघटना काय म्हणते..?
जागतिक हवामान संघटनेच्या मते, अल-निनो मे व जूनमध्ये 60 टक्के सक्रिय राहील. जून व ऑगस्टमध्ये 70 टक्के तर जुलै व सप्टेंबरमध्ये 80 टक्के सक्रिय राहणार आहे. असे असले तरीही त्याला मान्सूनसाठी जबाबदार धरणे चुकीचे आहे. तो एकटा घटक त्यासाठी कारणीभूत नाही. दर 2 ते 7 वर्षांनी प्रशांत महासागरात अल-निनोची सायकल सक्रिय होते. त्यामुळे तापमानवाढ, अवर्षणाची स्थिती येते; पण त्याचा सामना करणे शक्य आहे.

अल-निनो म्हणजे नेमके काय..?
जेव्हा प्रशांत महासागराच्या पूर्वेकडच्या भागातील पाण्याचे तापमान वाढते व पश्चिमेच्या भागातील हवेचा दाब वाढतो तेव्हा वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. त्यामुळे सर्व बाष्पयुक्त वारे त्या भागाकडे येऊ लागते. तेव्हा पूर्वेकडील भागात अतिवृष्टी होते, तर पश्चिमेकडील भागात दुष्काळी परिस्थिती होते, याला अल-निनोचा परिणाम म्हणतात. याच्या उलट परिस्थिती झाली, की त्याला ला-निनाचा परिणाम म्हणतात. थोडक्यात प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील तापमानाच्या फरकामुळे ही स्थिती होते. मोसमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी 16 घटकांचा अभ्यास केला जातो.

अल-निनोचा प्रभाव जूनपासूनच दिसत आहे. कारण, जूनमध्ये थोडातरी पाऊस पडतो. धूळपेरणीसाठी किमान 5 ते 10 सें. मी. पाऊस लागतो. तोही अद्याप पडलेला नाही. पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे वारे कमजोर झाले आहे. तसेच बिपोर जॉय चक्रीवादळाने आर्द्रता शोषून घेतल्याने मान्सून अतिशय क्षीण अवस्थेत एकाच जागी थांबला आहे.
                  – डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी, निवृत्त शास्त्रज्ञ, पुणे हवामान विभाग

प्रशांत महासागराचे व हिंदी महासागराचे तापमान सध्या एकसारखे म्हणजे 31 अंश सेल्सिअस इतके आहे. अल-निनो अजून सक्रिय झालेला नाही. मान्सून लांबण्याचे कारण अरबी समुद्रातील बिपोर जॉय हे वादळ आहे. त्याने बाष्प शोषून घेतल्याने मान्सूनचे वारे थांबले आहे. एकूणच परिस्थिती पाहता यंदा पाऊस कमी अन् अवर्षणाची शक्यता जास्त दिसत आहे.
                                – डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ, पुणे

हे ही वाचा : 

युक्रेनविरुद्ध रशियाचे नवे युद्धधोरण

Accident-Prone Places : राज्यभरातील रस्त्यांवर १,००४ ‘ब्लॅक स्पॉट’

Back to top button