

युक्रेनवर गेल्या वर्षभरापासून असंख्य प्रकारचे हल्ले करूनही हा देश शरण येत नाही, हे लक्षात आल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या युद्धधोरणात बदल केला. रशियन वायुसेनेचे क्षेपणास्त्र हल्ले युक्रेनी सेनेच्या प्रतिहल्ला क्षमतेला नष्ट करण्यासाठी होत आहेत. या धोरणानुसार रशियाचा पहिला मारा खेरसन क्षेत्रातील काखोवका धरणावर केला गेला. त्यातूनही युक्रेन बधला नाही आणि अमेरिका व 'नाटो' राष्ट्रांनी सामरिक विरोध केला, तर जगाला तिसर्या आण्विक महायुद्धाला सामोरे जावे लागेल, ही गभिर्र्त धमकी पुतीन यांनी बेलारूसमध्ये टीएनडब्ल्यू तैनात करून दिली आहे.
अमेरिका व 'नाटो' राष्ट्रांनी रशियाविरुद्ध प्रखर युद्ध सुरू केल्याचा कांगावा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियन सैन्य फेब—ुवारी 2022 मध्ये युक्रेनमध्ये शिरल्यानंतर सुरू केला. युद्ध सुरू होऊन जवळपास सव्वा वर्ष झाल्यानंतरही हवं तसं यश न मिळाल्यामुळे, रशियाने त्यांची टॅक्टीकल न्यूक्लिअर वेपन्स बेलारूसमध्ये तैनात करण्याचा निर्णय घेतला. एका वृत्तानुसार, रशियन न्यूक्लिअर वॉरहेडस्ची वाटचाल बेलारूसच्या दिशेनी सुरू झाली आहे. 1991 मध्ये सोव्हिएत युुनियनचे विघटन झाल्यानंतर देशाबाहेर झालेली रशियन 'टीएनडब्ल्यू'ची ही पहिली तैनाती असेल. ही रशियन 'टीएनडब्ल्यू' बेलारूसमध्ये कधी कार्यरत होतील याचे नक्की वेळापत्रक रशियाने जाहीर केलेले नाही. बेलारूसची आंतरराष्ट्रीय सीमा पोलंड, लिथुआनिया आणि लाटव्हिया या 'नाटो' सदस्य राष्ट्रांशी संलग्न आहे. त्यामुळे, बेलारूसमधील रशियन अण्वस्त्र तैनातीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अण्वस्त्रे बेलारूसमध्ये असलीत, तरी त्यांचा कंट्रोल रशियाकडेच राहील.
टीएनडब्ल्यू विवक्षित डावपेचात्मक यश मिळवण्यासाठी वापरण्यात येतील. त्यामुळे प्रचंड जीवितहानी करणार्या सामरिक अण्वस्त्रांपेक्षा त्यांची विदारक क्षमता नगण्य असते. सामान्यतः, टीएनडब्ल्यू बॉम्ब 12 फूट लांब आणि 0.3 ते 1.7 किलोटन शक्तीचा असतो. बेलारूस सोडता रशियाची अंदाजे 2 हजार टीएनडब्ल्यू अण्वस्त्रे इतर कुठल्याही देशांत तैनात केलेली नाहीत. उलटपक्षी, अंदाजे 200 अमेरिकन टीएनडब्ल्यू अण्वस्त्रे जर्मनी, टर्की, इटली, बेल्जियम, नेदरलँड आणि पोलंड या सहा देशांतील विमानतळांवर तैनात करण्यात आली आहेत. पंतप्रधान निकिता क्रुश्चेव्हच्या अधिपत्याखालील रशियाने 1962 मध्ये क्युबात क्षेपणास्त्रे तैनात करून जगाला पहिल्या वहिल्या अणुयुद्धाच्या खाईत लोटण्याचा चंग बांधला होता. त्यानंतर व्लादिमीर पुतीन हेदेखील युक्रेन युद्ध संपवण्यासाठी आज तीच वाट चोखाळताहेत असे अमेरिकन संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. नॉन प्रोलिफरेशन ऑफ न्युक्लिअर वेपन्स ट्रीटीअंतर्गत अण्वस्त्रधारी देश अण्वस्त्र नसणार्या राष्ट्रांना, अण्वस्त्रे आणि अण्वस्त्र विषयक तंत्रज्ञान देऊ शकत नाही; पण आपल्याच नियंत्रणाखाली असणारी आपली अण्वस्त्रे दुसर्या देशात तैनात करण्यावर कुठल्याही प्रकारचे प्रतिबंध नाहीत. आज रशिया त्याच कलमाचा फायदा उचलतो आहे. युक्रेनमध्ये रशियन अधिपत्याखाली लढणारा वॅगनर ग्रुप, बखमुत शहर काबीज करून रशियन सेनेला हस्तांतरित करण्याच्या तयारीत असताना रशियाने अण्वस्त्र बेलारूसमध्ये तैनात करण्याचा निर्णय घेतला, हा केवळ योगायोग निश्चितच नाही.
आता रशियन वायुसेनेचे क्षेपणास्त्र हल्ले संसाधने उद्ध्वस्त न करता रशियाच्या ताब्यात असलेल्या भूभागाला परत हस्तगत करण्यासाठी सुरू असलेल्या युक्रेनी सेनेच्या प्रतिहल्ला क्षमतेला नष्ट करण्यासाठी होत आहेत. या धोरणानुसार रशियाचा पहिला मारा खेरसन क्षेत्रातील काखोवका धरणावर केला गेला. 6 जून 2023 रोजी जगातील मोठ्या धरणात गणल्या जाणार्या या हायड्रो इलेक्ट्रिक धरण व सरोवराचा एक मोठा हिस्सा क्षेपणास्त्रांच्या मार्याने उद्ध्वस्त करण्यात आला. हजारो इमारती, ठिकाणे आणि वसाहती ज्ञायपर नदीमधील पुराच्या छाती इतक्या पाण्याखाली आल्यात. नदीच्या पूर्वेचा भाग पाण्याखाली आहे आणि तेथून दक्षिणेकडे जाणार्या वाटा, जमिनी व रस्ते चिखलानं भरले आहेत. युक्रेनच्या चिलखती फौजेचा मार्ग दुष्कर होऊन अमेरिकन-जर्मन रणगाडे पुढे जाऊ शकत नाहीयेत. परिणामी, ती रशियन इन्फंट्रीच्या अँटी टँक वेपन्सची शिकार बनताहेत. हीच परिस्थिती भारताने 1965 च्या लढाईत खेमकरण क्षेत्रात करून पाकिस्तानचे 56 अमेरिकन रणगाडे टिपले होते. हवालदार अब्दुल हमीद यांना इथेच सात रणगाडे टिपल्यामुळे परमवीर चक्र मिळाले होते. धरणावरील हा मिसाईल स्ट्राईक बहुदा नव्या रशियन युद्धधोरणाचा ओनामा होता. यानंतर त्याच क्षेत्रातील न्यूक्लियर प्लांट आणि इतर लक्ष्ये गाठली जातील.
सुमारे 85 वर्षांपूर्वी चीन आणि जपान यांच्यातील डॅम वॉरफेअरमध्ये 1 लाखाहून अधिक चिनी नागरिक ठार झाले होते. एका माहितीनुसार, सुमारे 1400 वर्षांपूर्वी पर्शियन (आताचे इराण) राजाने आपल्या सैन्यासाठी मार्ग तयार करण्याच्या उद्देशाने युफ—ेटिस नदीचा प्रवाह बदलला होता. युद्धामध्ये डॅम वॉरफेअर या युद्धनीतीचा तो ओनामा होता. या पर्शियन राजाने या रणनीतीचा अवलंब करत एका रात्रीत बॅबीलॉन जिंकले होते. अशाच प्रकारे मंगोली सैन्याने 1200 मध्ये एक धरण फोडल्याची नोंद आहे.
युक्रेनच्या रणांगणावर रशियन वायुसेना आता युक्रेनी सीमेकडे कूच करणारे युक्रेनी सैनिक, रणगाडे, तोफा, क्षेपणास्त्र वाहने व त्यांचे फॉरवर्ड स्टेजिंग पॉईंटस् आणि सीमेजवळील दारुगोळा आणि हत्यारांच्या युद्धक्षम ठिकाणांवर हल्ले करते आहे. रशिया आता अत्याधुनिक व प्रगत हत्यारांचा वापर करते आहे.
रशियन ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांची संख्या युक्रेनवरील प्रत्येक हल्ल्यानंतर वाढतेच आहे. दर वेळी नवी, अत्याधुनिक ड्रोन्स वापरली जातात. हे ड्रोन्स अतिशय कमी उंचीवरून, वे पॉईंट नेव्हिगेशनच्या आधारे उड्डाण करत, भिन्न भिन्न दिशांनी आपल्या लक्ष्यावर येत असल्यामुळे युक्रेनी एअर डिफेन्स सिस्टीमला गोंधळात पाडण्यात सफल होतात. हे ड्रोन्स उपग्रहांच्या माध्यमातून कंट्रोल केले जातात. लक्ष्यावर ते अतिशय कमी उंचीवरून, जमिनीच्या खाच खळग्यांना सेन्सर्सच्या मदतीने पाहत मोठ्या झुंडीनी येतात. कीव्ह, डोनबस्कसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवर प्रत्येकी सहा-सात क्रुझ मिसाईल्स आणि 12-13 ड्रोन्सचा मारा जवळपास रोजच दिवसातून दोन तीनदा होत असतो. रशियानं त्यांच्या उत्पादनात अनेक पटींनी वृद्धी केल्यामुळेच ती युक्रेनवर इतक्या प्रचंड प्रमाणात क्षेपणास्त्र व ड्रोन्सचा मारा करू शकते.
– कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)