नगर : पुढारी वृत्तसेवा : राज्यात स्काऊट व गाईड शिक्षणाची संस्कार क्षमता विचारात घेवून राज्यातील सर्व शाळांमध्ये स्काऊट शिक्षणाचा समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र गणवेश उपलब्ध करून दिला जाणार असून, मंगळवार, गुरुवार व शनिवार अशा तीन दिवस हा स्काऊट गाईड गणवेश घालून विद्यार्थी शाळेत येणार आहेत. समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश लाभ देण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना आहेत.
शाळा व्यवस्थापन मार्फत ही दोन गणवेशाचा लाभ दिला जाणार आहे. एका गणवेशासाठी 300 रुपयांप्रमाणे निधी असणार आहे. काही ठिकाणी गणवेश तयार करण्याचे काम सुरू आहे, त्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून शासनाने शाळा व्यवस्थापन समितीतस दिलेल्या निधीतून एक गणवेश खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. मात्र दुसरा गणवेश हा स्काऊट व गाईड साठीचा असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या विषयाला अनुसरून असणारा गणवेश उपलब्ध करून देणे आवश्यक होते.
असा असेल स्काऊट-गाईडचा गणवेश
मोफत गणवेश अंतर्गत संपूर्ण राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना एक समान रंगाचा व दर्जेेदार गणवेश उपलब्ध करून देण्याकरीता योजनेत बदल करण्यात आला आहे. मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगांची हाफपँट असणार आहे. तर मुलींसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा निळ्या रंगाची सलवार आणि आकाशी रंगाची कमिज असा गणवेश असणार आहे. तसेच टोपी आणि स्कार्फबाबत शासन वेगळ्या सूचना करणार आहेत.
तीन-तीन दिवस स्वतंत्र गणवेश
स्काऊट गाईड या विषयाच्या तासिका आठवड्यातून दोन दिवस असणार आहेत. यापैकी एक तासिका शनिवार आहे. त्यामुळे मंगळवार, गुरुवार व शनिवार हे तीन दिवशी स्काऊट गाईड गणवेश विद्यार्थ्यांनी परिधान करणे आवश्यक राहील. तर सोमवार, बुधवार व शुक्रवार शाळा व्यवस्थापनने निश्चित केलेला गणवेश असणार आहे.
हे ही वाचा :