बहुपक्षीय व्यापार प्रणालीमधील तफावत दूर करण्याच्या G-20 देशांच्या प्रस्तावाला पाठिंबा : पियुष गोयल | पुढारी

बहुपक्षीय व्यापार प्रणालीमधील तफावत दूर करण्याच्या G-20 देशांच्या प्रस्तावाला पाठिंबा : पियुष गोयल

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबईत आयोजित करण्यात आलेली पहिली G20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची (TIWG) बैठक, वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत आज (दि. ३१) संपन्न झाली. या तीन दिवसीय कार्यगटाच्या बैठकीसाठी, भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत G 20 सदस्य देश, निमंत्रित देश, प्रादेशिक गट आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे 100 पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित होते. शाश्वत विकास उद्दिष्टे गाठण्याच्या दिशेने प्रगती करताना, जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीला गती देण्यावर बैठकीतील चर्चेमध्ये भर देण्यात आला.

भारत आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पाठपुरावा करत असलेल्या, जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीशी संबंधित प्राधान्यक्रमांवर, 29 आणि 30 मार्च रोजी चार तांत्रिक बंद-दरवाजा सत्रांमध्ये चर्चा झाली. 29 मार्च रोजी झालेल्या चर्चेत व्यापार वृद्धी आणि समृद्धीसाठी आणि लवचिक जागतिक मूल्य साखळी (GVCs) तयार करण्याच्या उपायांवर विशेष भर देण्यात आला. 30 मार्चरोजी झालेल्या कामकाजाच्या दोन सत्रांमध्ये, जागतिक व्यापारात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे (एमएसएमई) एकीकरण करण्याच्या, G20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या प्राधान्यक्रमांवर आणि व्यापारासाठी कार्यक्षम लॉजिस्टिक तयार करण्यावर चर्चा झाली.

कार्यक्रम स्थळी, मसाले, भरड धान्ये, चहा आणि कॉफी या संकल्पनेवर आधारित एक्स्पेरीयंस झोन अर्थात अनुभव विभाग उभारण्यात आले होते. तसेच, भारताच्या वस्त्रोद्योग वारशाची झलक उपस्थित प्रतिनिधींना पाहायला मिळावी, यासाठी कापडांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. ताज पॅलेस इथे G20 प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तसेच भारताने आयोजित केलेल्या मेजवानीचे हे आयोजन स्थळ होते.

सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित आर्थिक विकासाच्या, भारताच्या जी 20 अजेंड्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाची आठवण करून देत, सार्वत्रिक मूल्यांना प्रोत्साहन देणे आणि मानव-केंद्रित दृष्टिकोन स्वीकारणे हा उद्देश असलेली भारताच्या जी 20 अध्यक्षतेची संकल्पना गोयल यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अधोरेखित केली.

कठीण भू- राजकीय स्थिती आणि जागतिक पातळीवरील चिंताजनक आर्थिक वातावरणात भारताने जी 20 अध्यक्षपदाचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. 2023 हे भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष असल्याने एक मध्यम मार्ग शोधत भारताला आपले प्राचीन ज्ञान जगासोबत सामायिक करण्याची ही योग्य वेळ आहे. असे त्यांनी नमूद केले. “एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य” प्रत्यक्षात आणण्यासाठी या प्राचीन ज्ञानाची प्रगत तंत्रज्ञानासह सांगड घातली जाऊ शकते. भारताच्या संपूर्ण गौरवशाली भूतकाळात देश लोकशाही, विविधता आणि समावेशकतेचा मशाल वाहक राहिला आहे, असे गोयल यांनी सांगितले.

सर्वसमावेशक विकासासाठी प्रत्यक्ष फलनिष्पत्तीच्या दृष्टीने, व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची महत्त्वाची भूमिका असून केवळ जी 20 सदस्य देशांमध्येच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साउथमध्ये व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी ही भूमिका सहाय्य्यकारी ठरेल, असा पुनरुच्चार पियूष गोयल यांनी केला.

बहुपक्षीय व्यापार प्रणालीमधील तफावत दूर करण्यासाठी समान उपाय शोधण्याच्या G-20 सदस्य देशांच्या प्रस्तावाला मंत्री पियुष गोयल यांनी दुजोरा दिला. सहयोग, शाश्वत विकास आणि उपाय -केंद्रित मानसिकतेद्वारे वाटचाल करणाऱ्या नव्या जगाच्या दिशेने प्रगती करण्यासाठी, विकसनशील आणि कमी विकसित देशांसह सर्व देशांच्या माध्यमातून आणि जागतिक व्यापाराच्या फायद्यांचे समान वितरण करण्याच्या मुद्दा त्यांनी जोरकसपणे मांडला.

यावर्षीचे जी 20 चिन्ह असलेल्या कमळापासून व्यापार आणि गुंतवणूक कार्य गटाच्या प्रतिनिधींनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन गोयल यांनी केले आणि चिखलातही निर्मळपणे फुलण्याच्या क्षमतेसाठी कमळाला जगभरात आदराचे स्थान आहे असे सांगत या अस्थिर आर्थिक काळात सर्वसमावेशक आर्थिक विकासासाठी आपण एकत्रितपणे उपाय शोधू शकतो, असे ते म्हणाले.

व्यापार आणि गुंतवणूकविषयक कार्यगटाच्या बैठकीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी, प्राधान्यक्रमांविषयी चर्चा करतांना जी-20 देशांच्या सदस्यांनी, गैर-शुल्क उपायांच्या प्रशासनात पारदर्शकता आणि जगभरातील मानकीकरण संस्थांमधील सहकार्य एकत्रित करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित केली. जागतिक मूल्यसाखळी विषयी अचूक अंदाज बांधता यावा, आणि त्यातून त्यांचा टिकावूपणा वाढावा, यासाठी मॅपिंग करणे आवश्यक आहे , असेही या चर्चेत नमूद करण्यात आले.

या सत्रामध्ये, अनेक सदस्य देशांनी, सध्या असलेल्या मूल्य साखळीविविधता आणण्याची गरज अधोरेखित केली तसेच, सर्वांगीण आर्थिक वाढीसाठी विकसनशील देश आणि एलडीसी मधील कंपन्यांच्या सहभागाला गती देण्याच्या गरजेवरही भर देण्यात आला. एमएसएमई उद्योगांसाठी माहिती आणि वित्तपुरवठा सुलभ करण्याच्या गरजेवर या सत्रांमध्ये तपशीलवार चर्चा करण्यात आली. त्याशिवाय, अनेक देशांनी एमएसएमई उद्योगांना असणारे डिजिटल प्रवेशाचे अडथळे दूर करण्यासाठी आणि डिजिटल व्यापारी प्लॅटफॉर्मशी त्यांना जोडून घेता यावे यासाठी गांभीर्याने आढावा घ्यावा, अशी भावना अनेक देशांनी या बैठकीत व्यक्त केली.

या बैठकीच्या चारही सत्रात झालेली चर्चा, अत्यंत अर्थपूर्ण होती, तसेच, सर्व चर्चा कृती प्रवण आणि फलदायी स्वरूपाच्या झाल्या, अशी माहिती, केंद्रीय वाणिज्य सचिव, सुनील बरतवाल यांनी दिली. वस्तू आणि सेवांचा स्थानिक पुरवठा वाढवण्यासाठी, व्यापार आणि गुंतवणूक एक महत्वाचे साधन आहे, असे असे सांगत, बरतवाल म्हणाले की जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीत येणारी आव्हाने एकत्रितरित्या समजून घेण्याचे सामर्थ्य अधिक वाढवणे, हे भारताच्या जी-20 अध्यक्षपदाचे उद्दिष्ट आहे. या अध्यक्षपदाचे भारताचे तत्व “वसुधैव कुटुंबकम” पासून प्रेरणा घेत, आज अस्तित्वात असलेल्या संधींचा जास्तीत जास्त लाभ घेत, त्यातून सामाईक समाधान काढता येण्यास पोषक वातावरण निर्माण करणे, हा ही भारताचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button