Marathi Bhasha Gaurav Din : …म्हणून पत्रव्यवहार करणारा पहिला पक्ष पण आमचाच : राज ठाकरे | पुढारी

Marathi Bhasha Gaurav Din : ...म्हणून पत्रव्यवहार करणारा पहिला पक्ष पण आमचाच : राज ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज ‘मराठी भाषा गौरव दिन’.  दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मराठी भाषा गौरव दिन’ निमीत्ताने  मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देत “‘… मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपलं स्वप्न असायला हवं. हे स्वप्न वास्तवात यावं, ह्याच मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा !’ हे ट्विट केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी पत्र लिहलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळावा म्हणून पत्रव्यवहार करणारा पहिला पक्ष पण आमचाच. वाचा सविस्तर बातमी. (Marathi Bhasha Gaurav Din)

Marathi Bhasha Gaurav Din : पत्रव्यवहार करणारा पहिला पक्ष  आमचाच

राज ठाकरे यांनी ‘मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देत पत्र लिहलं आहे. त्यांनी शुभेच्छा पत्रात काय म्हंटलं आहे ते वाचा त्यांच्याच शब्दात.

 सर्वप्रथम ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा !

कुसुमाग्रजांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाला अभिवादन म्हणून तेंव्हाच्या सरकारने, कुसुमाग्रज जयंती, २७ फेब्रुवारी, ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून घोषित केला. पण नेहमीप्रमाणे सरकारी उदासीनतेत तो साजरा व्हायचा. कुठल्याही राजकीय पक्षाला देखील तो साजरा करायची इच्छा नव्हती. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तो सार्वजनिक स्वरूपात अत्यंत उत्साहात साजरा करायला सुरुवात केली.

मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळावा म्हणून पत्रव्यवहार करणारा पहिला पक्ष पण आमचाच. हे सगळं सांगायचा उद्देश इतकाच की, आपल्या भाषेसाठी, आपल्या सणांसाठी, आपल्या संस्कृतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून इतर एकही पक्ष हिरहिरीने पुढे आलेला नाही. आणि सध्या जी एकूणच राजकीय दंगल सुरु आहे, त्यात कोणी येईल अशी शक्यता वाटत नाही.

असो, त्यामुळेच आजच्या दिवशी आपल्या लाडक्या ‘मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त शुभेच्छा देताना, ह्या भाषेसाठी आपल्याला सगळ्यांना उभं रहावं लागणार आहे हे भान सोडून चालणार नाही. व्यवहारात मराठी असावी, प्रशासनात मराठी असावी इथपासून ते अगदी दूरसंचार माध्यमांमध्ये, दूरदर्शनवरील समालोचनात, अभिजात भाषेच्या दर्जासाठीही आम्ही संघर्ष केला, आणि पुढे देखील करू. पण त्यासाठी आमच्या संघर्षाला तुमची साथ हवी तरच हे शक्य आहे. मला माहिती आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनच तुमच्या सगळ्या बाबतीत अपेक्षा असतात, पण ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुमच्या साथीचीही नितांत गरज आहे. आपण ‘मराठी एकत्र’ असू तर ‘सर्वत्र मराठी’ करायला क्षणाचाही विलंब लागणार नाही !

मी माझ्या विकास आराखड्यात म्हणलं आहे तसं, ‘मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी’ आणि ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा’ हे आपलं स्वप्न असायला हवं. हे स्वप्न वास्तवात यावं, ह्याच आजच्या दिवसाच्या शुभेच्छा!

आपला नम्र,

हेही वाचा

Back to top button