पुणे : पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ मतदारसंघात चुरशीची लढत झाल्याने पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला. पोटनिवडणुकीत सर्वसाधारणपणे कमी मतदान होते. मात्र,कसबा पेठेत पन्नास टक्के मतदान झाल्याने आणि थेट लढत असल्याने उमेदवाराला विजयासाठी किमान 65 हजार मतांपेक्षा अधिक मते लागणार आहेत. कसबा पेठेत एक लाख 38 हजार 18 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. थेट लढत झाल्याने अन्य उमेदवारांना कमी मतदान होण्याची शक्यता आहे.
उर्वरित उमेदवारांना दहा हजारांच्या आसपास मते मिळतील असे गृहीत धरले, तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये उर्वरित एक लाख तीस हजार मतांची विभागणी होईल. त्यामुळे किमान 65 हजारांपेक्षा जास्त मते मिळविणारा उमेदवार विजयी होईल.
गेल्या निवडणुकीत 2019 मध्ये कसबा पेठेत दीड लाख (51.6 टक्के) मतदान झाले होते. त्या वेळी भाजपच्या उमेदवार मुक्ता टिळक यांना 75 हजार 492 मते (50.3 टक्के) मते, तर काँग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे यांना 47 हजार 296 मते (31.52 टक्के) मते मिळाली. त्या वेळी टिळक 28 हजार मतांनी विजयी झाल्या. त्या वेळी त्यांना प्रभाग 15 (शनिवार, सदाशिव, नारायण पेठ) येथेच सुमारे 18 हजार मताधिक्य मिळाले होते. त्याच प्रभागातून त्या आणि रासने महापालिकेत निवडून गेले होते. पोटनिवडणुकीतही त्या प्रभागात गेल्या वेळेप्रमाणे पन्नास टक्क्यांच्या आसपास मतदान झाले आहे.
त्याच भागावर, तसेच लगतच्या प्रभाग 29 (दत्तवाडी, राजेंद्रनगर व लगतचा परिसर) येथे भाजपला चांगले मताधिक्य मिळेल, असा भाजपच्या कार्यकर्त्यांचा अंदाज आहे. प्रभाग 29 मध्ये टिळक यांना गेल्या वेळी सुमारे साडेपाच हजारांचे मताधिक्य मिळाले होते.
या मतदारसंघातील पश्चिम भागातील पेठांत धंगेकर यांना किती मते मिळणार, हे पाहावे लागेल. या भागात भाजपला मिळणारे मताधिक्यच रासने यांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.
1 शहराच्या पूर्वभागातील पेठांमध्ये व वस्त्यांमध्ये एकूण दीड लाखांच्या आसपास मतदान आहे. त्या भागातच महाविकास आघाडीने मोठे आव्हान उभे केले आहे. त्या भागातच भाजपविरोधात आरोपाच्या फैरी विरोधकांनी झाडल्या.
2विजय मिळविण्यासाठी पूर्वभागातील पेठांमध्ये धंगेकर यांना मोठी आघाडी मिळवावी लागणार आहे. शिवाजी रस्ता ते नेहरू रस्ता यामधील भागांमध्ये कसबा, रविवार, गणेश, बुधवार, शुक्रवार, नाना, गंज, घोरपडे पेठांमध्ये तसेच मुस्लीम वस्ती असलेले भाग, दलितांची वस्ती असलेले लोहियानगर या भागात विरोधकांचे मताधिक्य कमी करण्यासाठी भाजपने ताकद पणाला लावली होती.
3पूर्वभागातील पेठांमध्ये धंगेकरांना मोठे मताधिक्य मिळाल्यासच त्यांना विजय मिळू शकेल. त्यासाठी त्यांना भाजपने प्रभाग 15 आणि 29 मध्ये मिळविलेले मताधिक्य हे कमी करावे लागेल. त्यापेक्षा अधिक मते धंगेकरांना पूर्वभागातील पेठांत मिळवावी लागतील. भाजपचे मताधिक्य कमी न झाल्यास, रासने विजयी होतील.