मुंबई, चंदन शिरवाळे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्राला अद्यापही प्रतिसाद न मिळाल्यामुळे यंदाही मराठी भाषा गौरवदिनी मायबोली अभिजात दर्जापासून वंचितच राहिली आहे.
राज्यात 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. अभिजात भाषेचा निकष पूर्ण करणारा प्रस्ताव राज्य शासनाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार, 16 नोव्हेंबर 2013 रोजी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाच्या बाबतीत सर्व निकष पूर्ण करीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने तत्कालीन मराठी भाषा विकासमंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री किशन रेड्डी यांची भेट घेतली होती. त्यावेळी मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषाचा दर्जा मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली होती.
राज्यातील मराठी भाषिक नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवून सुमारे सव्वा लाखापेक्षा अधिक पत्रे राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठवली आहेत. दरम्यान, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्यालयाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिकमंत्री रेड्डी यांनी 3 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यसभेत दिली होती. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची विनंती केली होती. मात्र, शिंदे यांच्या पत्रालाही पंतप्रधान कार्यालयाकडून अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही.
दोन हजार वर्षांपूर्वीचे पुरावे
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आवश्यक असलेले सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचे सर्व पुरावे सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे मराठी भाषा हे अभिजात भाषेचे सर्व निकष पूर्ण करीत आहे. लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, असा विश्वास मराठी भाषा विकासमंत्री दीपक केसरकर यांनी नुकताच व्यक्त केला होता. प्रत्यक्षात केंद्र सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मायबोलीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळेल, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.