Sharad Pawar :..तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? या विधानावर शरद पवार यांनी दिले स्पष्टीकरण | पुढारी

Sharad Pawar :..तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? या विधानावर शरद पवार यांनी दिले स्पष्टीकरण

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात स्थापन झालेल्या पहाटेच्या सरकारचे भूतं काही केल्या अद्याप जायला तयार नाही. राज्याच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा पहाटेचे सरकार स्थापनेची गुपिते पुन्हा एकदा सत्ताधारी भाजप आणि विरोधी बाकावर असणाऱ्या राष्ट्रवादीकडून बाहेर येत आहेत आणि यावर आरोपांच्या फैरीही झडत आहेत. नुकतेच शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहाटेचे सरकार आले नसते तर राष्ट्रपती राजवट उठली असती का ? असे विधान केले होते. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती राजवट कुणाच्या सांगण्यावरुन लागली हे स्पष्ट करावे असे म्हणत पवार यांना प्रतिआव्हान दिले. यावर शरद पवार यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवटीबाबतच्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे.
उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ साली भाजप राष्ट्रवादीची सत्ता स्थापनेसाठी सर्व वाटाघाटी शरद पवार यांच्या सोबत झाल्या होते असे विधान केले होते. त्या नंतर शरद पवार यांनी पहाटे शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? असे विधान ही केले. (Sharad Pawar)
यावर पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी मग राष्ट्रपती राजवट कोणाच्या सांगण्यावरुन लागली हे देखील स्पष्ट करा असे प्रतिआव्हान शरद पवार यांना केले होते. राज्यातील दोन परस्पर विरोधी बड्या नेत्यांकडून एकमेकांवर सुरु असलेल्या जुगलबंदीने राज्याचे राजकारण पुन्हा एकदा तापले आणि पहाटेचे सरकार स्थापन्याच्या रंजक चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. (Sharad Pawar)
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार हे पुन्हा एकदा पुण्यात आले होते. या दरम्यान माध्यमांशी संवाद साधत असताना माध्यमांनी त्यांना राष्ट्रपती राजवट कोणाच्या सांगण्यावरुन लागली या देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नाबाबत विचारणा केली.
यावर शरद पवार म्हणाले, राष्ट्रपती राजवट जर माझ्या सांगण्यावरुन लागत असेल तर चांगली गोष्ट आहे. केंद्रामध्ये माझ्या सांगण्यावरुन सूत्र हालत असतील तर मला खूपच मान आहे, असे म्हणत शरद पवार म्हणाले, तर राष्ट्रपती राजवट उठली असती का ? हे विधान मी चेष्टेत केले होते. तसेच त्यामुळे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले याची देखील यावेळी आठवण करुन दिली.

अधिक वाचा :

Back to top button