धक्कादायक! क्लासेसला प्रवेश देण्याच्या बहाण्याने तरुणीशी ओळख केली, नंतर गुंगीचे औषध पाजून केला बलात्कार | पुढारी

धक्कादायक! क्लासेसला प्रवेश देण्याच्या बहाण्याने तरुणीशी ओळख केली, नंतर गुंगीचे औषध पाजून केला बलात्कार

पुणे, पुढारी वृत्तसेवा: क्लासेसला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने ओळख झाल्यानंतर तरुणीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही, तर संबंधित तरुणीला वेळोवेळी धमकावून फोटो व्हायरल करण्याच्या धमकीने 1 लाख 38 हजार रुपये उकळण्यात आले.

या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन तासांत आरोपी सुमित बाळासाहेब जेबे (वय 26,रा. संगमवाडी ढोलेपाटील रोड, मूळ -औरंगाबाद) याला अटक केली आहे. याबाबत 24 वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार जेबे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 9 नोव्हेंबर 2022 ते 9 फेब्रुवारी 2023 या कालावधीत घडली.

याबाबत सहायक पोलिस निरीक्षक कल्याणी पाडोळे यांनी सांगितले की, फिर्यादी तरुणी पदवीच्या पहिल्या वर्षात शिकते. तर तिचा लहान भाऊदेखील पुण्यात शिक्षण घेतो. त्याला एका नामांकित शैक्षणिक क्लासेसमध्ये प्रवेश घ्यायचा होता. आरोपी जेबे हा त्या क्लासेसमध्ये कन्सल्टंट म्हणून काम करतो. प्रवेशाच्या चौकशी दरम्यान दोघांचा परिचय झाला होता. फिर्यादी तरुणी व तिचा भाऊ पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर त्यांचा परिचय वाढत गेला. पुढे क्लासेसच्या नोट्स देण्या-घेण्यातून जेबे याने संबंधित तरुणीला हॉटेलमध्ये बोलावून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. जेव्हा तरुणीला हे समजले तेव्हा त्याने झालेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले, तर फोटो घरच्यांना व सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर देखील त्याने तरुणीला धमकावून कोथरूड, गोवा, लोणावाळा, अलिबाग येथे नेऊन वेळोवेळी लैंगिक अत्याचार करून पैसे उकळले. मात्र, सतत होणार्‍या त्रासाला कंटाळून तरुणीने एकेदिवशी हा प्रकार आपल्या घरच्यांच्या कानावर घातला. त्यानंतर त्यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहता तत्काळ गुन्हा दाखल करून दोन तासांत आरोपी जेबे याला अटक केली.

Back to top button