दोन नक्षलवाद्यांना अटक : गडचिरोली पोलिसांची कारवाई | पुढारी

दोन नक्षलवाद्यांना अटक : गडचिरोली पोलिसांची कारवाई

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : नक्षलवाद्यांच्या ‘टीसीओसी’ सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी दोन नक्षलवाद्यांना अटक केली आहे. मंगेश ऊर्फ कांडेराम पोटावी (३३ रा.होरादी,छत्तीसगड) आणि चिन्ना मासे झोरे (४० रा. रामनटोला) अशी अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत.

फेब्रुवारी ते मे या काळात नक्षलवादी ‘टीसीओसी’ (‘टॅक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन’) साजरा करतात. यादरम्यान ते मोठ्या प्रमाणात हिंसक कारवाया घडवून आणतात. यापार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत दोन नक्षल्यांना अटक करण्यात यश आले. त्यापैकी मंगेश हा जहाल नक्षली असून त्याला एटापल्ली तालुक्यातील कसनसूर येथून ताब्यात घेण्यात आले. तो छत्तीसगड राज्यातील नारायणपूर येथे परालकोट दलम कमांडर (चेतना नाट्य कलामंच) पदावर कार्यरत होता. २००५ मध्ये नक्षल चळवळीत सहभागी झाल्यानंतर त्याने गारपा व बोरेवाडा चमकीत सक्रिय भूमिका निभावली होती. त्याच्यावर दरोडा, खून, जाळपोळ आदी प्रकरणात गुन्हे दाखल आहेत.

दुसरा नक्षलवादी चिन्ना हा जनमिलिशिया सदस्य म्हणून सक्रिय होता. त्याला जांबिया जंगल परिसरातून ताब्यात घेण्यात आले. गर्देवाडा भुसुरुंगस्फोट व चकमक, बांधकामावरील वाहनांची जाळपोळ करणे आदी प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अधिक वाचा :

Back to top button