पुढारी ऑनलाईन डेस्क : शनिवारी निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरुपात शिवसेनेचे (Shivsena) नाव आणि चिन्ह गोठवले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज (दि. ९) रविवारी सायंकाळी फेसबुक लाईव्हद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, "आम्ही निवडणूक आयोगाकडे तीन चिन्ह आणि तीन नावांचा पर्याय दिला आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला यापैकी एक चिन्ह व नाव ताबडतोब द्यावे जेणे करुन आम्ही त्वरीत जनतेमध्ये जावू शकू. त्रिशुल, उगवता सूर्य आणि धगधगती मशाला या चिन्हा पर्याय आम्ही दिला आहे. तसेच नावासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे तीन पर्याय आम्ही निवडणूक आयोगाला पाठवले आहेत."
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गद्दारांनी पक्ष फोडला, भाजपशी युती करुन सत्ता स्थापन केली आणि शिवसेनेला संपविण्याचे कारस्थान सुरु केले. शिवसेनाप्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून हे सर्व कारवाया केल्या इथे पर्यंत ठीक होतं. पण, या गद्दारांनी आता या शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवण्याचे पाप केल्याची टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर नाव न घेता केली. यावेळी त्यांनी ४० डोक्यांच्या रावणीने प्रभू श्री रामाचं धनुष्यबाण गोठवलं अशी टीकाही त्यांनी केली.
आईच्याच काळजात कट्यार घुसवली (Shivsena)
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या शिवसेनेने तुम्हाला नाव दिलं तुम्हाला मोठं केलं, ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकीय ओळख दिली. अशा शिवसेनेचे नाव आणि चिन्ह तुम्ही गोठवलं. तुम्ही शिवसेना या आपल्या आईच्या काळजात कट्यार घुसवली, अशी टिका यावेळी ठाकरे यांनी शिंदे गटावर केली. तसेच शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांनी दिले. या शिवसेनेला माझ्या वडिलांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वाढवले. यावर तुम्ही हक्क कसे सांगू शकता असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
माझा न्याय देवतेवर विश्वास
उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, जो निवडणूक आयोगाने निकाल दिला तो निकाल अपेक्षित नव्हता. आम्ही कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली होती. कायद्याप्रमाणे हा निकाल अपेक्षित नव्हता. पण, आपण सर्वोच्च न्यायालायत गेला आहोत. तेथे आपल्या नक्की न्याय मिळेल. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. शिवसेनेला न्याय मिळेल. आयोगाच्या निकालामुळे मी डगमगलो नाही. माझ्यात आत्मविश्वास ठासून भरलेला आहे. मी शिवसैनिकांसोबत आहे आणि येणाऱ्या आव्हानला सामोरे जावू असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अधिक वाचा :