Union Budget 2023 : केंद्रीय अर्थसंकल्प बनविण्याच्या कामास सोमवारपासून होणार सुरुवात | पुढारी

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थसंकल्प बनविण्याच्या कामास सोमवारपासून होणार सुरुवात

नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा : आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प (Union Budget 2023) बनविण्याच्या कामास सोमवारपासून सुरुवात होत आहे. जागतिक मंदीची शक्यता वर्तविली जात असताना अर्थव्यवस्थेला चालना देणारा अर्थसंकल्प सादर करण्याचे आव्हान यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर असणार आहे.

सरकारच्या अखत्यारितील विविध मंत्रालये तसेच खात्यांच्या चालू वर्षातील सुधारित खर्चांचा तसेच पुढील वर्षी लागणाऱ्या अंदाजित निधीचा आढावा घेण्याची मोहिम सोमवारपासून सुरु होणार आहे. पहिल्याच दिवशी अर्थ मंत्रालयाकडून वन आणि पर्यावरण, कामगार आणि रोजगार, माहिती आणि नभोवाणी, सांख्यिकी तसेच कार्यक्रम क्रियान्वयन, क्रीडा आणि युवा कल्याण या मंत्रालयाकडून आवश्यक ती आकडेवारी घेतली जाणार आहे. मंत्रालये आणि खात्यांकडून त्यांना लागणाऱ्या निधीबाबतची माहिती पुढील महिनाभरात जमविली जाईल. १० नोव्हेंबरपर्यंत माहिती जमविण्याची ही प्रक्रिया चालणार आहे. (Union Budget 2023)

ज्या मंत्रालयांकडून ही आकडेवारी घेतली जाणार आहे, त्यात कृषी, सहकार, रस्ते आणि महामार्ग, रेल्वे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आदी मंत्रालयांचा समावेश असणार आहे. बजेटपूर्व बैठकांच्या आधी पुढील अर्थसंकल्पाचे बजेट इस्टीमेंट तयार केले जाईल. आगामी अर्थसंकल्प हा मोदी-२ सरकारचा पाचवा अर्थसंकल्प राहणार आहे. २०२४ च्या एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत, त्यामुळे १ फेब्रुवारी २०२३ रोजी सीतारामन यांच्याकडून सादर केला जाणारा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प राहणार आहे.

हेही वाचा

Back to top button