239 पाकिस्तानी नागरिक बनले भारतीय; कायद्यातील सुधारणेमुळे वेळेत प्रक्रिया होतेय पूर्ण

239 पाकिस्तानी नागरिक बनले भारतीय; कायद्यातील सुधारणेमुळे वेळेत प्रक्रिया होतेय पूर्ण

पुणे, पुढारी वृत्तसेवा: भारतीय नागरिकत्व देण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्यानंतर त्याचा वापर करीत पुणे जिल्हाधिकार्‍यांनी आतापर्यंत बांगलादेशातील एक, तर उर्वरित पाकिस्तानातील अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजातील 240 नागरिकांना नागरिकत्व बहाल केले आहे. याबाबतचे 20 प्रस्ताव दाखल झाले असून, ते चौकशीस्तरावर आहेत. परदेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे अधिकार केंद्र शासनाकडे होते.

तसेच, ही प्रक्रिया गुंतागुंतीची होती, त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना नागरिकत्व मिळत नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने 1955 च्या भारतीय नागरिकत्व कायद्यात 2016 मध्ये सुधारणा केली. त्यानुसार राज्यातील पुणे, मुंबई, ठाणे आणि नागपूर या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांना नागरिकत्व बहाल करण्याचे अधिकार देण्यात आले. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू नागरिकांना नागरिकत्व दिले जात आहे.

आतापर्यंत एकूण 240 परदेशी नागरिकांना नागरिकत्व देण्यात आले असून, त्यातील एक बांगलादेशी, तर उर्वरित नागरिक हे पाकिस्तानी आहेत. पाकिस्तानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे भीतीपोटी आणि व्यवसायानिमित्त 500 पेक्षा अधिक नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत. भारतीय नागरिकत्व नसल्याने त्यांना इथल्या सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच रेशन कार्ड, आधार कार्ड यांसारख्या सुविधाही मिळत नव्हत्या. परंतु, नागरिकत्व मिळाल्यानंतर सुविधा मिळायला सुरुवात झाली आहे.

कोणाला मिळते नागरिकत्व..?

नागरिकत्व कायद्यात सुधारणेमुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू नागरिकांना नागरिकत्व मिळते. मात्र, त्यासाठी अटींची पूर्तता करावी लागते. नागरिकत्व हवा असलेला नागरिक हा किमान सात वर्षे भारतात स्थायिक झालेला असावा. तसेच, मागील एक वर्षात भारताबाहेर प्रवास केलेला नसावा. तसेच परदेशी नोंदणी विभाग आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून झालेल्या चौकशीचा अहवाल सकारात्मक असल्यास नागरिकत्व दिले जाते.

पाकिस्तानातील सुमारे 500 पेक्षा अधिक नागरिक गेल्या काही वर्षांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्याला आहेत. केंद्र शासनाने कायद्यात सुधारणा केल्यामुळे प्रक्रिया सोपी झाली आहे. त्यामुळे नागरिकत्व मिळण्यास वेळ कमी लागत आहे. आतापर्यंत 240 नागरिकांना नागरिकत्व मिळाले असून, अन्य काही नागरिकांची प्रक्रिया सुरू आहे.

– बाळासाहेब रुणवाल, सामाजिक कार्यकर्ते

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news