पुणे : पालखी सोहळ्याने वाढणार उलाढाल

पुणे : पालखी सोहळ्याने वाढणार उलाढाल

युवराज खोमणे

बारामती : आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी निघणारा पालखी सोहळा दोन वर्षांनंतर होत आहे. त्यामुळे यंदा भाविक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी, मागील दोन वर्षे कोरोनाकाळात आर्थिक संकटात सापडलेल्या गावोगावी यंदा मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोरोना संकटातून सावरत असलेल्यांना मिळणार आर्थिक दिलासा

श्री क्षेत्र आळंदी, देहू येथून निघणार्‍या संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांसह राज्यभरात विखुरलेल्या विविध संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. श्री क्षेत्र देहू येथून दि. 20 जून रोजी; तर आळंदी येथून दि. 21 रोजी पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील गावांमध्ये मोठी उलाढाल होत आहे.

ग्रामीण भागातून शेतकरी, वारकरी मोठ्या संख्येने आषाढी वारी पालखी सोहळ्यात सहभागी होतात. त्यासाठीची जय्यत तयारी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. आळंदी, देहूतून पंढरीच्या दिशेने जाणार्‍या पालखी सोहळ्यावर हजारो व्यावसायिक अवलंबून असतात. मागील दोन वर्षे पायी पालखी सोहळा झाला नसल्याने अनेक छोट्या व्यावसायिकांना मोठा फटका बसला होता. याशिवाय पालखी मुक्कामी असलेल्या गावात एका दिवसात लाखो रुपयांची उलाढाल होते, तीही झाली नसल्याने मोठे नुकसान झाले होते. पालखी सोहळा पुन्हा होणार असल्याने थांबलेले अर्थचक्र पुन्हा गती धरणार आहे.

सोहळ्याच्या चैतन्यासह होणार आर्थिक लाभ

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दोन वर्षे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यासह अन्य संतांचा पायी पालखी सोहळा होऊ शकला नाही. प्रातिनिधिक स्वरूपात बसने पादुका पंढरपूरला नेण्यात आल्या होत्या.

त्यामुळे पायी पालखी सोहळ्याच्या आनंदाला सामान्य भाविकांना मुकावे लागले. पालखी सोहळ्यानिमित्त दरवर्षी लाखो भाविक बारामतीत दाखल होतात. सोहळाच रद्द झाल्याने गावोगावी होणारी लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. दोन वर्षानंतर पुन्हा पालखी सोहळा निघत असल्याने चैतन्यासह आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा सामान्यांसह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आहे.

व्यवसाय करीत पायी वारी पूर्ण

पान-फुलविक्रेता, गंध लावणारे, प्रसादाची दुकाने, फुगे, खेळणी विकणारे, कपडे, हॉटेल, चहाविक्रेते, पाळणे, फळ विक्रेते यांना दरवर्षी पालखी सोहळ्यादरम्यान मोठा आर्थिक लाभ होतो. पालखीत छोटा व्यवसाय करायचा अन् पायी वारी करून देवदर्शनाचा लाभही घ्यायचा, या उद्देशाने अनेक छोटे व्यावसायिक पालखी सोहळ्यात भक्तीभावाने सहभागी होत असतात.

प्रशासनाचीही जय्यत तयारी

बारामती तालुक्यातून मानाच्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका या दोन संतांच्या पालखी जातात. सोहळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी या दोन्ही मार्गावरील दुरुस्तीची कामे सुरू आहेत. याशिवाय प्रशासन, ग्रामपंचायती, आरोग्य विभाग यांनी सोहळा दिमाखदार व्हावा यासाठी कंबर कसली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news