

पुणे : पुढारी वृत्तसेवा
महापालिका निवडणूकीसाठीच्या आरक्षण सोडत येत्या दि. 31 मेला निघणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंबधीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आरक्षण सोडतीनंतर इच्छुकांसाठी प्रभागातील चित्र स्पष्ट होणार असून त्यानुसार मोर्चेबांधणीला सुरुवात होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकांची अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यातील 13 महापालिका निवडणूकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोगाकडून सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यानुसार आरक्षण सोडतीची जाहीर नोटीस 27 मेला निघेल. 31 मेला सर्वसाधारण प्रभागातील तसेच एससी आणि एसटी आरक्षित प्रभागातील महिला आरक्षण 31 'मे'ला काढण्यात येणार आहे. 1 ते 6 जुन या कालावधीत त्यावर हरकती आणि सुचना मागविण्यात येणार आहे. या हरकती-सुचनांवर कार्यवाही होऊन 13 जुनला अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिध्द होणार आहे.
दरम्यान पुणे महापालिकेतील एससी प्रवर्गाच्या 23 आणि आणि एसटी प्रवर्गाच्या 2 आरक्षित प्रभागांची यादी जाहीर केली आहे. आता या आरक्षित प्रभागातील महिला आणि इतर 33 खुल्या प्रभागातील महिला आरक्षित जागांची सोडत निघणार आहे. आरक्षण सोडतीनंतर नक्की कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवायची यासंबधीचे चित्र इच्छुकांसाठी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे निवडणूकीच्या तयारीला वेग येणार आहे.