कांदा पंधरा रुपये किलोवर आल्याने सामन्यांना मोठा दिलासा | पुढारी

कांदा पंधरा रुपये किलोवर आल्याने सामन्यांना मोठा दिलासा

पुणे: इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंमध्ये महागाई वाढत असताना दुसरीकडे कांद्याचे प्रतिकिलोचे दर पंधरा ते वीस रुपयांवर आले आहेत. वाढत्या महागाईमध्ये दररोज स्वयंपाकात लागणार्‍या कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने गृहिणी वर्गाला दिलासा मिळत आहे.

कोरोनाकाळात देशभरात कांद्याची लागवड कमी प्रमाणात झाली. त्यात मोठा प्रमाणात कांदा लागणार्‍या दक्षिणेतील राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला. हाताशी आलेले पीक पावसामुळे वाया गेल्याने उत्पादनात मोठी घट झाली. त्या तुलनेत राज्यातील कांद्याला मागणी वाढली. परिणामी, याकाळात घाऊक बाजारात कांद्याला किलोला सरासरी 15 ते 25 रुपये दर मिळाला. सलग दोन वर्षे कांद्याला चांगले दर मिळाल्याने राज्यातील शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली. याखेरीज आंध्रप्रदेश, कर्नाटक व मध्य प्रदेशात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. त्याला हवामानाचीही साथ मिळाल्याने उन्हाळी कांद्याच्या उत्पानात मोठी वाढ होऊन शहरातील बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वाढल्याचे चित्र आहे.

Gyanvapi : ज्ञानवापी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात दररोज दहा टनांच्या 40 ते 50 ट्रक कांद्याची आवक होत आहे. पुणे, नगर व नाशिक भागासह राज्यातून विविध विभागातून कांदा विक्रीसाठी दाखल होत आहे. घाऊक बाजारात कांद्याच्या प्रतिकिलोला 5 ते 13 रुपये दर मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात कांद्याचे प्रतिकिलोचे दर पंधरा ते वीस रुपयांवर आले आहेत.

Monkeypox : मुंबई विमानतळावर होणार परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी

भाव कमी झाल्याने शेतकर्‍यांनी कांद्याची साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कांद्याचे घटलेले दर टिकून आहेत. येत्या काळात कांद्याच्या भावात वाढ झाल्यास बाजारातील आवक वाढण्यास सुरुवात होईल. त्यानंतर वातावरणातील परिस्थितीनुसार कांद्याचे भाव ठरतील. – राजशेखर पाटील, कांदा व्यापारी

Back to top button