मुंबई ; पुढारी ऑनलाईन : कोरोनाचा विळखा हळूहळू सैल होत असतानाच आता मंकीपॉक्स रोगामुळे सर्वांची चिंता वाढवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ब्रिटन, अमेरिका, पोर्तुगाल, स्पेन, बेल्जियम, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, कॅनडा आणि इटली या देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने तातडीने पाऊले उचलत परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबईतील कस्तुरबा रूग्णालयात मंकीपॉक्स (Monkeypox) संसर्गाच्या रूग्णांसाठी एक कक्ष राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची (Monkeypox) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन आंतरराष्ट्रीय विमानतळे, बंदरे आणि देशाच्या सीमाभागांत लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. तसेच आफ्रिकेतून येणार्या ज्या प्रवाशांमध्ये लक्षणे दिसून येतील त्यांचे नमुने पुढील तपासणीसाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे पाठवले जातील.
ज्यांच्यात काही लक्षणे आढळून येतील केवळ त्याच रुग्णांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे पाठवण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांना युरोप व अन्य देशांतील ताज्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास बजावले आहे. सुदैवाने भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
ब्रिटनच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या तिथे एकूण 20 रुग्णांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी फायदेशीर ठरणारी लस मिळवण्यासाठी ब्रिटन सरकारकडून जोमाने प्रयत्न करण्यात येत आहेत.
हेही वाचलंत का ?