

पुणे : वयाचा अडसर न ठरता मनसिक इच्छाशक्तीवर दुखापतीनंतरही कात्रज जुना बोगदा ते कोंढणपूर फाटा (के 2 एस) असा ट्रेक पूर्ण करीत त्याचा रौप्यमहोत्सव साजरा केला. सुशील सुधीर दुधाणे या ५३ वर्षांच्या 'तरुणा'ने हा पराक्रम केला आहे.
सह्याद्री रांगेतील के 2 एस हा ट्रेक अवघड समजला जातो. या उपक्रमाबाबत दै. 'पुढारी'शी बोलताना दुधाणे म्हणाले, 'आतापर्यंत मी हा ट्रेक 25 वेळा केला आहे. या ट्रेकचे अंतर जवळपास 14 किमी आहे. साधारणतः 14 टेकड्या चढाव्या व उतराव्या लागतात.
ट्रेकचा हा रौप्यमहोत्सव साजरा करीत असताना जवळपास 10 टेकड्या मी आरामात व कोणतेही कष्ट न होता पार केल्या; पण नजरचुकीने 11 वी टेकडी चढण्याच्या अगोदर एका दगडाला उजवा पाय धडकला व पाय मुरगळला.चालणे कठीण असतानाही मनात जिद्द आणि माझे सहकारी सुनील शिरोळे, राजेश तिखे यांच्या मदतीने माझा हा ट्रेक पूर्ण केला. हा ट्रेक पूर्ण केल्यानंतर आनंद तर झालाच, पण पुढील ट्रेकची आशाही लागून राहिली आहे.
सुशील सुधीर दुधाणे यांनी 2006 पासून ट्रेकला सुरुवात केली. आतापर्यंत 275 ट्रेक व 191 गड-दुर्गांची भ्रमंती केलेली आहे. हिमालयातील कांचनजुंगा बेस कॅम्प, भागीरथी 2 अॅडव्हान्स बेस कॅम्प, स्टोक कांगरी बेस कॅम्प, सारपास ट्रेक, अमरनाथ, अलंग, मदन, कुलंग (3 वेळा), लिंगाणा (3 वेळा), तैलबैला (2 वेळा), डांग्या सुळका, मोरोशीचा भैरवगड हे ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केले आहेत.