पाण्याचे एटीएम धूळ खात; देखभाल दुरुस्तीकडे कंपनीचे दुर्लक्ष | पुढारी

पाण्याचे एटीएम धूळ खात; देखभाल दुरुस्तीकडे कंपनीचे दुर्लक्ष

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पाण्यापासून होणार्‍या विविध आजारांपासून संरक्षण करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डातील रहिवाशांना एटीएमद्वारे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आले. मात्र, एटीएम बसवणार्‍या कंपनीने देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने यंत्र धूळ खात पडून आहेत. विशेष म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पत्रव्यवहाराला गुजरातमधील संबंधित कंपनी दाद देत नसल्याची माहिती समोर आली आहे. पावसाळ्यात नळ अथवा बोअरवेलद्वारे येणारे पाणी दूषित असते. त्यामुळे विविध आजार होण्याची शक्यता असते. देशात दरवर्षी दूषित पाणी प्यायल्यामुळे मृत्यू पावणार्‍यांची संख्या काही लाखांत आहे. घरोघरी स्वच्छ पाण्यासाठी प्युरिफायर वापरले जाते.

एक प्रकाशवर्ष म्हणजे नेमकं किती अंतर?

त्यासाठी सुमारे 12 ते 15 हजार रुपये खर्च येतो. हा खर्च प्रत्येकाला करणे शक्य नसते. त्यामुळे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी एटीएम बसविण्यात आले. ‘रिचार्ज’ केलेले एटीएम कार्ड मशीनमध्ये स्वाइप केल्यानंतर हवे तेवढे पाणी मिळत होते. कँन्टोन्मेंट बोर्डातील रहिवाशांना सर्व आठ वार्डामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले. सुरुवातीला दोन वर्ष सुरुळीत सुरू होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून यंत्र बंद आहे. त्याची देखभाल-दुरुस्ती संबंधित कंपनीकडे आहे. या एटीएमची दुरुस्ती करण्यासाठी गुजरातमधील संबंधित कंपनीला कळविण्यात आले. मात्र, त्याकडे कंपनीने दुर्लक्ष केले आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डातील रहिवाशांना एटीएमद्वारे शुद्ध पाणी उपलब्ध देणे, ही आमची जबाबदारी आहे. शहरात बसविण्यात आलेल्या एटीएमची माहिती संबंधित विभागाकडून घेऊन त्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या जातील.
– सुब्रत पाल, मुख्यकार्यकारी अधिकारी, पुणे कॅन्टोमेंट बोर्ड.

 

हेही वाचा :

Back to top button