एक प्रकाशवर्ष म्हणजे नेमकं किती अंतर? | पुढारी

एक प्रकाशवर्ष म्हणजे नेमकं किती अंतर?

न्यूयॉर्क ः आपल्याकडे मोजमापाची अनेक परिमाणं लोकांना बुचकळ्यात टाकत असतात. अमूक फॅरेनहाईट म्हणजे किती सेल्सिअस, अमूक मैल म्हणजे किती किलोमीटर, अमूक गॅलेन म्हणजे नेमकं किती लिटर अशा कोष्टक कोड्यात माणूस पडत असतो. अंतराळ संशोधनाविषयीच्या बातम्या वाचत असताना नेहमीच ‘प्रकाशवर्ष’ हा शब्द येत असतो.

अंतराळातील अंतर सांगत असताना या शब्दाचा वापर केला जातो. मात्र, एक प्रकाशवर्ष म्हणजे नेमकं किती अंतर हे अनेकांना समजत नाही! एक प्रकाशवर्ष अंतराची व्याख्या सांगायची तर ती ‘निर्वात पोकळीमध्ये प्रकाशवेगाने एका वर्षात गाठलेले अथवा पूर्ण केलेले अंतर’ अशी होते किंवा एका वर्षात एखादा प्रकाशकिरण जितके अंतर कापतो ते! हेच जर आकड्यात सांगायचे तर एका प्रकाशवर्षात 94,60,73,04,72,580.8 किलोमीटर इतके अंतर असते. सुमारे दहा ट्रिलियन किलोमीटर इतके हे अंतर आहे.

आता ‘प्रकाशवर्ष’ हेच एकक का वापरले जाते हा प्रश्‍न अनेकांना पडू शकतो. याचे कारण म्हणजे अंतराळ हे अपरिमित आहे. उदा. प्रॉक्झिमा सेंटॉरी नावाचा तारा हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा आहे. तो पृथ्वीपासून किती अंतरावर आहे हे किलोमीटर किंवा मैलात मोजायचे ठरवले तर या आकड्यात अनेक शुन्या जोडाव्या लागतील व ते मोजणे कठीण होऊन जाईल. त्याऐवजी हा तारा 4 प्रकाशवर्ष दूर आहे असे म्हणणे अधिक सोपे ठरते! ‘प्रकाशवर्ष’ हेच एकक मानण्याचे दुसरे कारण म्हणजे प्रकाश सर्वत्र एकाच वेगाने प्रवास करतो.

हेही वाचलतं का?

Back to top button