कारला 1100 कोटी रुपयांची मिळाली किंमत! | पुढारी

कारला 1100 कोटी रुपयांची मिळाली किंमत!

बर्लिन ः ‘जुनं ते सोनं’ म्हणतात ते काही खोटं नाही. आजही जुन्या जमान्यातील मोटारी व मोटारसायकलींना लिलावात मोठीच किंमत मिळत असते. आता जर्मन कार कंपनी ‘मर्सिडिझ बेंझ’च्या 1955 मधील मॉडेल असलेल्या ‘मर्सिडिझ बेंझ 300 एसएलआर’ या स्पोर्टस् कारला लिलावात तब्बल 1100 कोटी रुपयांची किंमत मिळाली आहे. ती लिलावात सर्वाधिक किंमत मिळवणारी कार ठरली आहे.

अमेरिकन उद्योजक डेव्हिड मॅकनील यांनी ही कार खरेदी केली आहे. कंपनीने 1955 मध्ये अशा कारचे केवळ दोनच मॉडेल बनवले होते हे विशेष! ही कार आपल्या लूक्स आणि परफॉर्मन्समुळे जगभरात प्रसिद्ध आहे. तसेच महागड्या क्लासिक कारमध्ये या स्पोर्टस् कारचा समावेश होतो. ही एक रेसिंग कार आहे व तिचे रूपडेही अतिशय देखणे आहे. या कारमध्ये 3.0 लिटरचे इंजिन आहे. कारचा कमाल वेग ताशी 180 किलोमीटर आहे. या कारला अनेक लोक ‘मोनालिसा ऑफ कार्स’ असे म्हणत असत.

कंपनीने या कारच्या लिलावाची बाब गुप्‍त ठेवली होती. ऑटोमोबाईल क्षेत्राशी निगडीत केवळ दहा लोकांनाच या लिलावासाठी बोलावण्यात आले होते. जर्मनीच्या स्टटगार्ट येथील मर्सिडिझ बेंझ म्युझियममध्ये या कारचा लिलाव करण्यात आला. त्यावेळी कारला 143 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 1100 कोटी रुपयांची किंमत मिळाली. या लिलावाने फेरारी 250 जीटीओच्या लिलावाचा विक्रम मोडला. या कारला 70 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 542 कोटी रुपयांची किंमत मिळाली होती.

हेही वाचलतं का?

Back to top button