नगर : नुसताच मालकी हक्क.. साधी मोजणीही नाही! आदिवासींच्या अतिक्रमणाचा प्रश्न कायम | पुढारी

नगर : नुसताच मालकी हक्क.. साधी मोजणीही नाही! आदिवासींच्या अतिक्रमणाचा प्रश्न कायम

शशी पवार
तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलावाच्या सातशे एकर जागेवर महापालिकेचे नाव लागून मालकी हक्क प्रस्थापित झाला. मात्र, त्या जागेची साधी मोजणीही अजून झालेली नाही. आजपर्यंतचे महापौर आणि आयुक्तांनी या तलावाच्या जागेवर मोठमोठे प्रकल्प राबविण्याच्या घोषणा केल्या, पण त्या हवेतच विरल्या आहेत. प्रकल्प राबविण्याचा ठोस निर्णय घेण्यात येत नसल्याने या तलावाचे निश्चित होणार तरी काय? असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.
जेऊर व पिंपळगाव हद्दीतील पिंपळगाव तलावाचे क्षेत्र महानगरपालिकेच्या नावावर करण्यात आलेले आहे. सुमारे 700 एकर क्षेत्र महानगरपालिकेच्या नावावर झालेले आहे. येथे पालिकेकडून प्रकल्प उभारणीच्या पोकळ गोष्टी ऐकून ऐकून नागरिक थक्क झाले आहेत. पालिकेत आलटून पालटून विविध पक्षांची सत्ता आली, महापौर बदलत गेले. प्रत्येकाकडून पिंपळगाव तलावातील क्षेत्रावर प्रकल्प उभारणार असल्याची घोषणा झाली. पण, प्रत्यक्षात अजूनपर्यंत जागेची साधी मोजणी करून हद्द निश्चित करण्यात आलेली नाही.
त्यामुळे तलाव परिसरातील वृक्षतोड करून वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. काही गावकर्‍यांनी हा तलाव पाटबंधारे विभागाकडे वर्ग करावा, अशी मागणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केलेली आहे. मंत्री तनपुरे यांनी सर्व गावांची इच्छा असल्यास निश्चितच त्यासाठी प्रयत्न करू म्हणून तलाव पाटबंधारे विभागाकडे वर्ग करण्यास हिरवा कंदिल दाखविला आहे. एकंदरीत पिंपळगाव तलावा बाबतीत होणार तरी काय? हा प्रश्न पंचक्रोशीतील ग्रामस्थांना पडला आहे. याबाबत कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने नागरिकही संभ्रमावस्थेत आहेत.
समाजाची मोठी वस्ती आहे. आम्ही येथे पिढ्यानपिढ्या राहत असून, सदर क्षेत्रावर आमच्या नावाची नोंद व्हावी म्हणून अनेक वर्षे आदिवासी समाज शासनदरबारी लढा देत होता. तसेच, हे प्रकरण दिल्ली येथील अनुसूचित जनजाती आयोगाकडे देखील दाखल आहे. आयोगाने तलावात येऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली होती. येथील आदिवासी समाज आमचे पुनर्वसन करा, तसेच आमची उपजीविका तलावावर अवलंबून असल्याने आम्ही जलसमाधी घेऊ, पण जागा सोडणार नाही, अशी भूमिका घेताना दिसून येतो. अशातच जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून पिंपळगाव तलाव पाटबंधारे विभागाकडे वर्ग करण्याची मागणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
जेऊर, धनगरवाडी, डोंगरगण, मांजरसुंबा गावांना पाणी
महानगरपालिकेच्या नावावर क्षेत्र झालेले अनेक वर्ष झाले असून येथे उभारण्यात येणार्‍या प्रकल्पांच्या नावाची भली मोठी यादी तयार होईल एवढ्या घोषणा नागरिकांनी ऐकल्या. परंतु प्रत्यक्षात काहीही कारवाई झालेली नाही. पिंपळगाव तलावातील क्षेत्राकडे पालिकेचे दुर्लक्ष झालेले दिसून येते. बेसुमार बेकायदेशीर पाणी उपसा, वृक्षतोड, वनसंपदेचे मोठे नुकसान या बाबीकडे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. पिंपळगाव तलावातून जेऊर, धनगरवाडी, डोंगरगण, मांजरसुंबा गड या गावांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे.
दोनशे झाडांचीच कत्तल; मनपा अधिकार्‍यांकडून पाहणी
महापालिकेच्या मालकीच्या पिंपळगाव तलावाच्या हद्दीतील दोनशे झाडांचीच कत्तल करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने गुरूवारच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर केला आहे. कत्तल झालेल्या झाडांच्या बुंध्याला नंबर टाकण्यात आले असून, दोन दिवसांत वृक्षतोड करणार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.
पिंपळगाव तलावाच्या आजूबाजूच्या विविध जातीच्या झाडांची खुलेआम कत्तल सुरू असल्याची तक्रार गोरख आढाव यांनी केली होती. महापालिकेचे उद्यान विभागप्रमुख शशिकांत नजन यांनी बुधवारी कर्मचार्‍यांच्या पथकासह पिंपळगाव माळवी तलाव परिसरात जाऊन वृक्षतोडीची पाहणी केल्यानंतर लिंब, बाभूळ अशा सुमारे दोनशे झाडांची कोणीतरी कत्तल झाल्याचे समोर आले. कत्तल झालेल्या दोनशे झाडांचे फोटो काढण्यात आले आहेत. दरम्यान, वनविभागालाही याबाबत पत्र देण्यात आले असून, त्यांनी प्रत्यक्षात पाहणी करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, असे म्हटले आहे.
आदिवासी समाजाचे सुमारे दोनशे ते अडीचशे कुटुंब येथे पिढ्यान पिढ्या राहत आहेत. त्यांची उपजीविका तलावातील मासेमारी व तलावाच्या कडेला थोडीफार शेती करून चालू आहे. येथे रस्ते, वीज, पाणी,शाळा कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. येथील चिमुकल्यांचे भविष्य अंधारमयच आहे. जागा नावावर नसल्याने आम्हाला शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही. आमचे पुनर्वसन केले तरी तलावावरील हक्क आम्ही सोडणार नाही. तेच आमचे उपजीविकेचे साधन आहे. 
                                                                                                  बाळासाहेब पवार, 
                                                                                        अध्यक्ष एकलव्य आदिवासी विकास संस्था
पिंपळगाव तलावाचे भिजत घोंगडे
पिंपळगाव तलावातील क्षेत्राची मोजणी करून हद्द निश्चित करण्यात येणार आहे. परंतु क्षेत्र मोठे असल्याने त्यासाठी वेळ जाणार आहे. तलावातील वृक्षतोडी संदर्भात वन विभाग तसेच मनपाच्या वतीने वेगवेगळ्या दोन कारवाया करण्यात येणार आहेत.
                                                                                                   शंकर गोरे, 
                                                                                 आयुक्त, महानगरपालिका, अ.नगर

Back to top button