

नवी दिल्ली ः आफ्रिकेतील जंगल असो किंवा अमेरिकेतील अॅमेझॉनचे जंगल असो, अनेक ठिकाणी आधुनिक माणसापासून दूरच राहणारे आदिवासी पाहायला मिळतात. सध्याच्या 21 व्या शतकातही ही माणसं आधुनिक माणसांपासून फटकूनच वागतात व आपल्या परिसरात येऊ देत नाहीत. भारताच्याही एका बेटावर हजारो वर्षांपासून राहणारे असे आदिवासी आहेत.
या बेटाचे नाव आहे नॉर्थ सेंटिनल आयलंड. तेथील आदिवासी कधीही बेट सोडून बाहेर जात नाहीत की बाहेरच्या माणसांना बेटावर येऊ देत नाहीत. या बेटावर राहणारे लोक आजही उदरनिर्वाहासाठी जंगल आणि समुद्रावरच अवलंबून आहेत. बेटावर जाण्याचा प्रयत्न करणारा माणूस सहसा जिवंत परत येत नाही. या बेटावर आदिवासींचे हजारो वर्षांपासून चालत आलेले नियम व कायदेच आहेत. भारतात असूनही या बेटावर भारताचे कायदे व नियम लागू नाहीत.
जगाशी फटकून राहणारे हे आदिवासी याठिकाणी दोन हजारांपेक्षाही अधिक काळापासून राहत आले आहेत. जीनोमच्या अध्ययनावरून असेही म्हटले गेले की ही जनजाती तीस हजार वर्षांपूर्वीही अंदमानच्या या बेटावर अस्तित्वात होती. तेथील लोक स्थानिक सेंटीनलीज भाषाच बोलतात व आजही पाषाणयुगातीलच अवजारांचा, धनुष्य-बाणाचा वापर करतात. बंगालच्या उपसागरातील हे बेट म्हणजे एक छोटासा भाग असून तो या आदिवासींसाठीच संरक्षित केलेला आहे.
चारही बाजूंनी समुद्र आणि बेटावर जंगल असलेल्या या भागात हे लोक आपल्या रूढी-परंपरा सांभाळत हजारो वर्षे राहत आलेले आहेत. दक्षिण अंदमान प्रशासनिक जिल्ह्याच्या अंतर्गत हे क्षेत्र येते. याठिकाणी निग्रीटो (अश्वेत आणि कमी उंचीचे लोक) राहतात. ते बेटाबाहेरील लोकांना आपले शत्रू मानतात. संशोधकांचे म्हणणे आहे की त्यांची शारीरिक रचना व भाषा पाहता ते जारवा समुदायाशी संबंधित असावेत. या लोकांना आधुनिक जगाच्या कोणत्याही मदतीची अपेक्षा नाही. विशेष म्हणजे 2004 मध्ये आलेल्या त्सुनामीवेळीही ही जनजाती कोणत्याही मदतीशिवाय तग धरून राहिली. या संरक्षित क्षेत्रात प्राधिकरणाच्या अधिकार्यांशिवाय अन्य कुणालाही जाण्यास मज्जाव आहे.