पुण्यातील निर्बंधही शिथिल होणार! सोमवारपासून अंमलबजावणी | पुढारी

पुण्यातील निर्बंधही शिथिल होणार! सोमवारपासून अंमलबजावणी

पुणे; पांडुरंग सांडभोर : पुण्यातील निर्बंधही शिथिल होणार : मुंबई नंतर आता पुण्यातील निर्बधही सोमवारपासून शिथिल होणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी यासंदर्भात शनिवारी चर्चा केली. त्यात पुण्यातील निर्बंध शिथिल  करण्यासाठी मुख्यमंत्र्यानी ग्रीन सिग्नल दिला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

उद्या रविवारी पुण्यात उपमुख्यमंत्रांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या आढावा बैठकीत यावर  अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. कोरोना रुग्णाची संख्या घटल्यानंतर राज्य शासनाने मुंबईसह काही जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले आहेत.

पुण्यातील निर्बंधही शिथिल होणार

त्याठिकाणी रात्री आठपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यासह अन्य अटीही शिथिल केल्या आहेत. मात्र, पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्ह दर 5 टक्क्यांपेक्षा कमी असतानाही येथील निर्बध कमी केलेले नाहीत.

त्यामुळे व्यापारी वर्गासह नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.

पुण्यातही रात्री आठपर्यंत दुकाने उघडी उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करत व्यापारी संघटनांनी निर्बध झुकारून सात पर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास सुरवात केली. भाजपनेही व्यापाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा दिला.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही निर्बंध उठवण्याबाबत शासनाला पत्र पाठवले आहे. राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यांनी पुण्यातील निर्बंध कमी करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांना साकडे घातले.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी पुण्यातील निर्बध कमी करण्याबाबत चर्चा केली.

मुख्यमंत्र्यानीही वस्तुस्थिती लक्षात घेऊन शहरातील निर्बंध कमी करण्यास मंजुरी दिली.

रविवारी होणाऱ्या बैठकीत दुकाने नक्की किती वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यायची आणि आणखी कोणते निर्बध कमी करायचे यावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.  सोमवारपासून हे निर्बध शिथिल होतील.

हे ही वाचलं का?

Back to top button