केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टवर बोलण्यास शरद पवारांचा नकार | पुढारी

केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टवर बोलण्यास शरद पवारांचा नकार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कामावर समाधानी आहे. हे सरकार सत्तेतील पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त करून आणखी पुढील पाच वर्षे सरकारला मिळाली, तर चांगलेच होईल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. ते आज (शनिवार) नांदेड येथील सह्याद्री विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.

दरम्यान, अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर आक्षेपार्ह केलेल्या पोस्टवर भाष्य करण्यास शरद पवार यांनी नकार दिला. ते पुढे म्हणाले की, ज्यांना महाराष्ट्राचा, देशाचा इतिहास माहिती नाही, असे लोक शांततेत राज्य चालत असताना नवीन प्रश्‍न निर्माण करत आहेत, त्यांचा आम्ही निषेधच करतो. राज्यातील अतिरिक्‍त उसाचे गाळप करण्याबाबत राज्यशासन प्रयत्नशील असून कारखाने बंद करू नयेत, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार भक्कमपणे काम करत असून पुढील पाच वर्षे आणखी सरकार राहील, असे ते यावेळी म्हणाले. नारायण राणे, चंद्रकांत पाटील हे नेहमी तारखा, वेळ देतात हे आम्ही ऐकत आलो आहोत तसेच पाहत आलो आहोत, त्यामुळे आम्ही फक्‍त त्यांना ‘एन्जॉय’ करतो, असे म्हणत पवार यांनी राणे, पाटील दुकलीची खिल्ली उडविली.

राष्ट्रीयीकृत बँकांचा सर्वसामान्यांकडे पाहण्याचा सहानुभूतीचा दृष्टिकोन असला पाहिजे, कृषिसंस्था, नागरी बँका यांच्या बाबतीतही आरबीआयने सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. राज्य व देशात सध्या व्यक्‍तिगत संघर्षाचे काम केंद्रातील सत्ताधारी पक्षाकडून सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे व माझ्यामध्ये मतभेद होते; पण त्यात व्यक्‍तिगत संघर्ष कधीही नव्हता. केंद्र सरकारकडून ज्याप्रकारची भूमिका घेतली जात आहे, ती योग्य नाही. नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या बाबतीत केलेल्या कारवाईबद्दल पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. मुलभूत प्रश्‍नांची सोडवणूक करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत असल्याचे ते यावेळी म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतची भूमिका महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी विचारविनिमय करून ठरवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेस गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील, जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, डॉ. सुनील कदम, शंकर धोंडगे, वसंत सुगावे आदी  उपस्थित होते.

दरम्यान, अभिनेत्री केतकी चितळे (ketaki chitale) ही आपल्या सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे सतत चर्चेत असते. तिच्या पोस्टमध्ये नेहमी असभ्य भाषा आणि शिव्या पहायला मिळतात. अशा अनेक पोस्टमुळे ती अनेकदा चांगलीच ट्रोलदेखील झाली आहे, तसेच तिला अनेकांची टीकादेखील सहन करावी लागली आहे. आता तिने थेट राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांना टार्गेट करत त्यांच्यावर असभ्य आणि अर्वाच्च शब्दांत टीका केली आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये एक काव्य लिहित अत्यंत खालच्या शब्दांत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button